मुंबई: आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक विकास केंद्र म्हणून ओळख असलेल्या वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) आजच्या घडीला वाहतूक कोंडीचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) कुर्ला रेल्वे स्थानक ते वांद्रे रेल्वे स्थानक असा ८.८५ किमीचा पॉड टॅक्सी प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन झाले आहे.

आता या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली जाणार असून त्यातील ३.३६ किमीचा पहिला टप्पा २० महिन्यांत पूर्ण करण्याचे आश्वासन कंत्राटदार कंपनीने मंगळवारी दिले. त्यामुळे डिसेंबर २०२७ मध्ये पॉड टॅक्सी रस्त्यावरून धावणार असून आठ स्थानकांवरून प्रवाशांना पॉड टॅक्सीने प्रवास करता येणार आहे. बीकेसीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी २०१० मध्ये पॉड टॅक्सीची संकल्पना पुढे आणली गेली.

दुबई, हिथ्रोमध्ये धावणारी पॉड टॅक्सी मुंबईत सुरू करण्याचा हा निर्णय होता. मात्र आतापर्यंत हा प्रकल्प कागदावरच होता. बीकेसीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न जटिल झाल्यानंतर एमएमआरडीएने हा प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार यासंबंधीचा प्रस्ताव प्राधिकरण बैठकीत मान्य करून घेत याचा आराखडाही मंजूर केला. त्यानंतर खासगी-सार्वजनिक सहभागातून ८.८६ किमीचा कुर्ला स्थानक ते वांद्रे स्थानक व्हाया बीकेसी असा पॉड टॅक्सीच्या मार्गिकेची बांधणी करण्यासह पॉड टॅक्सीचे संचालन करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली. साई ग्रीन मोबिलिटी या कंपनीने निविदेत बाजी मारत कंत्राट मिळवले. आता या कामाचे भूमिपूजन झाले असून तात्काळ प्रत्यक्ष कामास सुरुवात केली जाणार आहे. ८.८६ किमीच्या पॉड टॅक्सीच्या मार्गिकेत २२ स्थानके असतील.

मात्र पहिल्या टप्प्यात ८.८६ किमीपैकी ३.३६ किमीच्या पॉड टॅक्सी मार्गिकेचे बांधकाम करून यावर पॉड टॅक्सी सुरू केली जाणार आहे. या ३.३६ किमीच्या मार्गिकेवर कुर्ला, एलबीएस मार्ग, एमएमआरडीए पे अँड पार्क, बीडीबी गेट-११, वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक, कलानगर, एमएमआरडीएची जुनी इमारत आणि उत्पादन शुल्क विभाग इमारत अशी आठ स्थानके असतील. दोन टप्प्यांत या प्रकल्पाचे काम केले जाणार असून आठ स्थानकांचा समावेश असलेली पॉड टॅक्सीची ३.३६ किमीची मार्गिका २० महिन्यांत, अर्थात डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण करून पॉड टॅक्सी सेवेत दाखल करू, असे आश्वासन भूमिपूजनावेळी कंत्राटदार कंपनीने मुख्यमंत्र्यांना दिले. त्यामुळे डिसेंबर २०२७ मध्ये बीकेसीत उन्नत मार्गावरून पॉड टॅक्सी धावताना दिसेल. मात्र या पॉड टॅक्सीचा पुढील टप्पा, उर्वरित १४ स्थानकांचे काम पूर्ण होऊन संपूर्ण ८.८५ किमीच्या मार्गिकेवर पॉड टॅक्सी सुरू करण्यासाठी २०३१ उजाडण्याची शक्यता आहे. दरम्यान, एका पॉड टॅक्सीत एकावेळी ६ प्रवासी प्रवास करू शकतील. तर या प्रवासासाठी प्रवाशांना प्रति किमी २१ रुपये असे दर मोजावे लागणार आहेत.

त्यानुसार वांद्रे स्थानक ते बीकेसीसाठी ५० ते ७५ रुपये मोजावे लागतील. या दरात दरवर्षी ४ टक्क्यांनी वाढ होणार आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेचा हा अत्याधुनिक पर्याय प्रवाशांना महागडा ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर या सेवेला कसा प्रतिसाद मिळतो, महागडा प्रवास प्रवाशांच्या पसंतीस उतरतो का, हे ही सेवा कार्यान्वित झाल्यानंतरच स्पष्ट होईल.