मुंबई : करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागताच पालिकेने वांद्रे-कुर्ला संकुलात बांधलेल्या जम्बो करोना केंद्राला दोन वर्ष पूर्ण झाली असून त्यानिमित्त गुरुवारी या केंद्रात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या दोन वर्षांमध्ये या केंद्रामध्ये तब्बल २६ हजार ६८३ करोनाबाधित रुग्ण दाखल झाले होते. तर येथील लसीकरण केंद्रामध्ये चार लाख ८१ हजार ७९७ नागरिकांनी करोना प्रतिबंधक लस घेतली.

 करोनाबाधितांची वाढती संख्या आणि त्यांच्या विलगीकरणाची गरज लक्षात राज्य सरकारने वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीएच्या मैदानावर भव्य असे जम्बो करोना केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या उभारणीची जबाबदारी एमएमआरडीएवर सोपविली. एमएमआरडीएने युद्धपातळीवर अवघ्या १७ दिवसांमध्ये पहिल्या टप्प्यातील सुसज्ज असे १०२७ खाटांचे जम्बो करोना केंद्र उभारले. या जम्बो केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते १८ मे २०२० रोजी करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात अवघ्या २० दिवसांमध्ये १०८ खाटांचा समावेश असलेला अतिदक्षता विभाग उभारण्यात आला आणि त्याचे १७ जून २०२० रोजी उद्घाटन करण्यात आले. वांद्रे-कुर्ला संकुल जम्बो करोना केंद्र तब्बल तीन लाख ३० हजार ७५४ चौरस फुटांवर उभे राहिले. येथील सुविधांमुळे करोनाबाधितांसाठी हे केंद्र वरदान ठरले.

करोना काळातील नकारात्मक वातावरणात डॉक्टर आणि आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले. फूडबॉट आणि मेडबॉट नावाचा हा रोबोट रुग्णांना अन्न आणि औषधे वितरित करीत होता. हा रोबोट १४ ऑगस्ट २०२० पासून कार्यरत आहे. 

केंद्राचे विशेष..

  • गेल्या दोन वर्षांमध्ये वांद्रे-कुर्ला संकुल जम्बो केंद्रात तब्बल २६ हजार ६८३ रुग्णांवर उपचार करण्यात आले.
  •   पहिल्या टप्प्यात शून्य मृत्यूसह १० हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले. या केंद्रातील अतिदक्षता विभागात २,७२९ रुग्णांवर उपचार करण्यात आले.
  •   करोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेअंतर्गत वांद्रे-कुर्ला संकुल जम्बो केंद्रातही लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले.
  • गेल्या दोन वर्षांमध्ये तब्बल चार लाख ८१ हजार ७९७ व्यक्तींनी येथे करोना प्रतिबंधक लस घेतली. या केंद्राला दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गुरुवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
  • यावेळी उपायुक्त विजय बालमवार, रमाकांत बिराजदार, केंद्राचे अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे आदी मान्यवर उपस्थित होते.