मुंबई: वांद्रे पूर्व येथील निर्मल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार वर्षांच्या एका बालिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याची  घटना समोर आली आहे. या प्रकरणी निर्मल नगर पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवून त्याच परिसरात राहणाऱ्या ४० वर्षीय संशयित आरोपीला अटक केली आहे. या विकृत कृत्यामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट पसरली असून स्थानिक नागरिकांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे येथील निर्मल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पीडित चार वर्षांची मुलगी आणि संशयित ४० वर्षीय आरोपी हे एकाच परिसरात वास्तव्यास आहेत. आरोपीने मुलगी एकटी असल्याचे पाहून तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बालिकेच्या पालकांनी व नातेवाइकांनी निर्मल नगर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. विशेष पथक तयार करून आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आले आहे. पीडित बालिकेला वैद्यकीय तपासणीसाठी पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांकडून बाल कल्याण समितीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पुढील तपास सुरू असून, आरोपीला न्यायालयात हजर केले जाणार आहे.