मुंबई : पश्चिम रेल्वेने प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन वांद्रे टर्मिनस – पालितानादरम्यान विशेष अतिजलद रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष भाडे आकारण्यात येणाऱ्या या रेल्वेगाडीच्या दोन फेऱ्या होणार आहेत. त्याचबरोबर मुंबई सेंट्रल – अहमदाबाद आणि मुंबई सेंट्रल – इंदूर मार्गावरील विशेष रेल्वेगाड्यांच्या सेवांनाही नोव्हेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.
गाडी क्रमांक ०९०२३ वांद्रे टर्मिनस – पालिताना विशेष ६ सप्टेंबरला रात्री ७.२५ वाजता वांद्रे टर्मिनसहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ९.२५ वाजता पालिताना येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०९०२४ पालिताना – वांद्रे टर्मिनस विशेष ७ सप्टेंबरला रात्री ८ वाजता सुटून ८ सप्टेंबरला सकाळी ९.३० वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचेल. या रेल्वेगाडीला बोरिवली, वापी, वलसाड, सुरत, वडोदरा, आणंद, अहमदाबाद, बोटाद, धोळा, सोनगढ आणि सिहोर येथे थांबे असतील. या रेल्वेगाडीला शयनयान आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील.
मुंबई सेंट्रल – अहमदाबाद विशेष रेल्वेगाडीच्या फेऱ्या अनुक्रमे २५ आणि २६ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आल्या आहेत. मुंबई सेंट्रल – इंदूर विशेषच्या ०९०७९ / ०९०८० रेल्वेगाड्या अनुक्रमे २९ आणि ३० नोव्हेंबरपर्यंत, तर ०९०८५ / ०९०८६ रेल्वेगाड्या अनुक्रमे २७ आणि २८ नोव्हेंबरपर्यंत धावतील. आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर या विशेष गाड्यांचे आरक्षण सुरू आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली.
