म्हाडाच्या मुंबई मंडळाला मिळणार ३९२ कोटी रुपये महसूल
मुंबई : वांद्रे पश्चिम येथील रेल्वे रुळांना लागून असलेल्या म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या मालकीच्या भूखंडावर मोठ्या संख्येने झोपड्या उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे परिसराला बकालपणा रुप आले असून आता मात्र या परिसराचा कायापालट होणार आहे. परिघा खाडी येथील २८ हजार चौरस मीटर जागेचा विकास करण्याचा निर्णय मुंबई मंडळाने घेतला आहे. या जागेच्या विकासासाठी शुक्रवारी मुंबई मंडळाने निविदा प्रसिद्ध केली. या निविदेनुसार नियुक्त कंत्राटदारावर येथील ४५० झोपड्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी सोपविण्यात येणार असून येथील जागेचा विकासही कंत्राटदारामार्फत केला जाणार आहे. त्यामुळे या जागेवर आता लवकरच उत्तुंग व्यावसायिक इमारती उभ्या राहतील. या विकासातून मुंबई मंडळाला किमान ३९२ कोटी रुपये महसूल मिळण्याची शक्यता आहे.
वांद्रे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील रुळांपासून ते पुढे एस. व्ही. रोडपर्यंत मुंबई मंडळाच्या मालकीची मोठी जागा आहे. ही जागा व्यावसायिक विकासासाठी राखीव आहे. या जागेकडे मंडळाचे दुर्लक्ष झाल्याने या भूखंडावर मोठ्या संख्येने झोपड्या उभारल्या गेल्या. आजघडीला या ठिकाणी सुमारे ४५० झोपड्या असण्याची शक्यता आहे. ही सर्व अतिक्रमणे असून ती हटविण्याचे मोठे आव्हान मुंबई मंडळासमोर आहे.
दरम्यान, आपल्या मालकीच्या या भूखंडाचा विसर मंडळाला अनेक वर्षे पडला होता. मात्र आता या जागेकडे मंडळाने लक्ष वेधले आहे. त्यानुसार परिघा खाडी येथील भूखंड क्रमांक ७ आणि ८ चा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येथील २८ हजार चौरस मीटर जागेच्या विकासासाठी शुक्रवारी मंडळाने निविदा प्रसिद्ध केली आहे. सध्याच्या स्थितीतील जागेचा विकास करण्यासाठी ही निविदा काढण्यात आली आहे. त्यामुळे जो विकासक किंवा कंत्राटदार नियुक्त होईल त्याच्यावर या जागेवरील ४५० झोपड्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी असणार आहे. त्यांचे पुनर्वसन त्याच जागेवर केले जाण्याची शक्यता आहे. तसेच जागेच्या विकासाअंतर्गत विकासकाकडून येथे व्यावसायिक इमारती उभारण्यात येणार आहेत.
निविदेनुसार २८ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड व्यावसायिक विकासासाठी ३०-३० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर दिला जाणार आहे. भूखंड व्यावसायिक वापरासाठी राखीव असल्याने त्याचा विकास व्यावसायिक संकुल म्हणूनच करणे नियुक्त विकासकाला बंधनकारक असणार आहे. हा भूखंड भाडेतत्त्वाने देण्यासाठी मंडळाने बोली दर निश्चित केले आहेत. त्यानुसार मंडळाला यातून किमान ३९२ कोटी रुपये मिळणार असल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. तसेच लवकरात लवकर निविदा प्रक्रिया पूर्ण करून निविदा अंतिम करण्याचे आणि या भूखंडाच्या विकासाला तसेच झोपड्यांच्या पुनर्वसनाला सुरुवात करण्याचे मुंबई मंडळाचे नियोजन असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
