मुंबई : वांद्रे रिक्लेमेशन येथील ८,४५० चौरस मीटर क्षेत्राच्या प्रसिद्ध नेव्हिल डिसोझा फुटबॉल मैदानावरील क्रीडांगणाचे आरक्षण बदलून तेथे प्रदर्शन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव सुधार समितीत मंजूर झाल्यानंतर आता महासभेच्या पटलावर ठेवण्यात आला आहे. येत्या आठवड्यात हा प्रस्ताव चर्चेसाठी येण्याची शक्यता आहे. या प्रस्तावाला विरोध करण्याची भूमिका काँग्रेसने घेतली असून फुटबॉल मैदान हटवण्याचा कोणताही प्रस्ताव खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा मुंबई काँग्रेसने दिला.
मुंबई महापालिकेतील काँग्रेसच्या नगरसेवकांनी गुरुवारी महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांची भेट घेऊन फूटबॉल मैदानाचे आरक्षण बदलण्यास विरोध दर्शवला. वांद्रे रिक्लेमेशन येथील ८,४५० चौरस मीटर क्षेत्राच्या प्रसिद्ध नेव्हिल डिसोझा फुटबॉल मैदानावरील क्रीडांगणाचे आरक्षण बदलून तेथे प्रदर्शन केंद्र उभारण्याचा प्रस्तावाला पालिकेच्या सुधार समितीने गेल्या महिन्यात मंजुरी दिली. हा प्रस्ताव महापालिकेच्या ऑगस्ट महिन्यातील कामकाजात समाविष्ट करण्यात आला आहे. पुढील आठवड्यात हा प्रस्ताव चर्चेसाठी येणार असून त्याला मोठ्या प्रमाणावर विरोध होण्याची शक्यता आहे.
या प्रस्तावाला फुटबॉल प्रेमींचा, स्थानिक नागरिकांचा विरोध वाढू लागला आहे. हा प्रस्ताव मागे घ्यावा आणि मैदानाचे क्रीडा आरक्षण कायम ठेवावे, तसेच ते आधुनिक क्रीडा सुविधांनी विकसित करावे, अशी मागणी करणारी ऑनलाइन स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली होती. या प्रस्तावाला कडाडून विरोध करण्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे. महानगरपालिकेतील काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांच्या नेतृत्वाखाली सर्व नगरसेवकांनी गुरुवारी आयुक्त आश्विनी भिडे यांची भेट घेऊन यासंदर्भात एक निवेदन सादर केले.
यावेळी स्थायी समिती सदस्य व नगरसेविका ट्युलिप मेरिंडा, मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक सुरेशचंद्र राजहंस उपस्थित होते. ”नेव्हिल डिसूझा फुटबॉल मैदान”चे आरक्षण ”खेळाचे मैदान” असे होते , ते बदलून ”प्रदर्शन/संमेलन केंद्र” करण्याच्या प्रस्तावाला काँग्रेसने विरोध दर्शविला आहे. हे मैदान केवळ जमिनीचा एक तुकडा नाही, तर ती मुंबईच्या फुटबॉल क्षेत्राची मुख्य आधारशिला आहे. येथे सुमारे ४०० युवा क्लब आणि ३०० वरिष्ठ क्लबच्या माध्यमातून दरवर्षी ८,००० ते १०,००० तरुण फुटबॉलपटू सराव करतात. हे मैदान मुंबईचा क्रीडा वारसा आणि हजारो उदयोन्मुख खेळाडूंच्या स्वप्नांचे प्रतीक आहे. त्यामुळे पालिकेने
हा प्रस्ताव मागे घ्यावा, अशी मागणी काँग्रेसने केली. भाजपा महायुती सरकार तरुण पिढीच्या लोकशाही हक्कांवर गदा आणत आहे. वांद्रयातील जमीन बड्या उद्योगपतींच्या घशात घालण्याचे षडयंत्र आहे. पालिका प्रशासन सत्ताधारी पक्षाच्या जवळच्या लोकांना उघडपणे मैदाने, उद्याने आणि रुग्णालये सोपवत आहे. मुंबईच्या भविष्यासाठी हे घातक आहे. या मैदानाचा वापर बदलण्याचा महापालिकेचा अजेंडा मागे घ्या आणि म्हाडाला दुसऱ्या पर्यायी जागेचा शोध घेण्याचे निर्देश द्या, असे मत काँग्रेस गटनेते अशरफ आजमी यांनी व्यक्त केले.
