मुंबई : वांद्रे पश्चिम येथील लिंकिंग रोडवरील व्ही. एन. स्फिअर मॉलमधील ‘फू’ उपाहारगृहाला शुक्रवारी पहाटे भीषण आग लागली. उपाहारगृहातील स्वयंपाकघर आणि भोजनकक्षात लागलेल्या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला. अग्निशमन दलाच्या जवानांना धुरामुळे आग विझविताना अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, सुमारे तीन तासांच्या प्रयत्नांनंतर आग पूर्णपणे विझविण्यात यश आले. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.

‘फू’ उपाहारगृहात शुक्रवारी पहाटे ५.३० च्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाला पहाटे ६ च्या दरम्यान याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर सकाळी ६.३० वाजता अग्निशमन दलाने दुसऱ्या स्तरावरील आगीचा इशारा घोषित केला. वांद्रे अग्निशमन केंद्रातील जवान सर्वप्रथम घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आठ अग्निशमन गाड्या, पाण्याचे टँकर आणि अन्य मदतवाहने घटनास्थळी दाखल झाली.

उपाहारगृहाच्या स्वयंपाकघर आणि भोजनकक्षात मोठ्या प्रमाणात धूर आणि ज्वाळा पसरल्या होत्या. धुरामुळे अग्निशमनात अडथले येत होते. त्यामुळे वरच्या भागात जाणेही कठीण झाले होते. अशा परिस्थितीत अग्निशमन दलाच्या जवानांनी श्वसनासाठी विशेष उपकरणे वापरून आत प्रवेश केला आणि आग विझविण्याचे काम सुरू केले.अग्निशमन दलाचे उपमुख्य अधिकारी एच. व्ही. गिरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग विझविण्याचे काम आव्हानात्मक होते. मात्र, जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून आगीवर नियंत्रण मिळविले. सकाळी ९ वाजता आग पूर्णपणे विझविण्यात आली.

या घटनेनंतर अग्निशमन दल, पोलीस, संबंधित वीज वितरण कंपनीचे कर्मचारी, रुग्णवाहिका आणि मुंबई महापालिकेचे विभागीय कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. खबरदारीचा उपाय म्हणून १०८ क्रमांकाची रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आली होती. या आगीत कोणालाही दुखापत झाली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.