मुंबई : दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक बाणगंगा तलावात नुकतेच शेकडो मासे मृतावस्थेत आढळून आल्याने तलावातील जल प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पितृपक्षाच्या काळात तलावात मोठ्या प्रमाणावर झालेले पिंडदान या घटनेला कारणीभूत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. तलावातील पाण्यावर स्निग्ध पदार्थांचा थर साचल्यामुळे माशांना पुरेसे ऑसिजन मिळाले नाही, असा दावा पर्यावरणप्रेमींकडून केला जात आहे. दरम्यान, तलावातील पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. गिरगाव चौपाटी येथून मलबार हिलच्या टेकडीवर चढण चढून गेल्यानंतर टेकडीच्या पश्चिम किनाऱ्याच्या टोकाला बाणगंगा तलाव आहे.
हा परिसर आजूबाजूने समुद्राने वेढलेला असूनही मध्यभागी गोड्या पाण्याचे कुंड असणे हे बाणगंगा तलावाचे विशेष आकर्षण आहे. अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे तलावाच्या पायऱ्या, पायऱ्यांचे दगड, दीपस्तंभांची दुरवस्था झाल्यामुळे महाराष्ट्र राज्य शासनाच्या आदेशानुसार मुंबई महानगरपालिकेने बाणगंगा तलाव पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेतला आहे. असे असतानाही ऐतिहासिक महत्व असलेला तलाव प्रदूषणमुक्त ठेवणे प्रशासनाला शक्य झालेले नाही. त्यामुळे प्रशासनाच्या कारभारावर टीका केली जात आहे. बाणगंगा तलावात दरवर्षी पितृपक्षात मोठ्या संख्येने नागरिक पिंडदानासाठी येतात.
यंदाही तलावात धार्मिक विधी करण्यात आले. दरम्यान, शनिवार आणि रविवारी तलावात शेकडो मासे मृतावस्थेत आढळून आल्याने तलावातील पाण्याच्या गुणवत्तेचा आणि जलजीवांच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यापूर्वीही तलावात मृत माशांचा खच पडल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र, त्या घटनेची पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी तलावाच्या ठिकाणी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. पिंडदानासाठी वापरण्यात येणारे पिठाचे गोळे, तेल, तूप अबीर-गुलाल, फुले व अन्य पदार्थांमुळे पाण्याची गुणवत्ता खालावल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर महापालिकेने तलावातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले असल्याचे पालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. सद्यस्थितीत तलावातून मृत मासे बाहेर काढण्याचे काम महापालिकेमार्फत केले जात आहे.
प्रशासनाने तलावातील प्रदूषणाकडे लक्ष देऊन प्रभावी उपाययोजना करावी, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत आहे. अनेकवेळा तक्रारी देखील केल्या. तलावाची जबाबदारी खासगी ट्रस्ट, हेरिटेज समिती आणि मुंबई महापालिका यांच्याकडे असून या दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करण्याऐवजी ते एकमेकांकडे बोट दाखवत आहेत, असा आरोप स्वामी गगनगिरी महाराज सेवा ट्रस्टचे विश्वस्त संजय शिर्के यांनी केला. गणेशोत्सवात तलावात विसर्जन टाळण्यासाठी महापालिकेने बॅरिकेडिंग केले होते. ते पितृपक्षापर्यंत ठेवणे आवश्यक होते. मात्र, सप्टेंबरच्या अखेरीस पालिकेने ते काढून टाकले, असेही त्यांनी नमूद केले.
