मुंबई : पुणे येथून पारपत्र मिळवून सौदी अरेबियाला जाणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला इमिग्रेशन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. आरोपी १३ वर्षांपूर्वी बांगलादेशातून बेकायदेशिररित्या भारतात आला होता. त्यानंतर तो दोन वेळा भारतीय पारपत्रावर सौदी अरेबियाला गेला होता. अखेर  छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या उस्मान किरमत सिद्धीकी ऊर्फ मोहम्मद ओसमान किरमतअली बिस्वास याला पकडण्यात आले. बनावट कागदपत्र व पारपत्र प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आरोपीविरोधात सहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> तब्बल २५ वर्षांनंतर ‘म्हाडा’ला जाग, इरई नदीकाठी ‘नवीन चंद्रपूर’

मोहम्मद ओसमान नुकताच आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. त्याला सौदी अरेबियाला जायचे होते. त्याच्या पारपत्राची पाहणी केल्यानंतर त्याचा जन्म कोलकाताचा असून त्याने पारपत्र पुण्यात काढल्याचे निदर्शनास आले. त्याच्या बोलीभाषेवरून तो बांगलादेशी नागरिक असल्याचा इमिग्रेशन अधिकार्‍यांना संशय आला होता. त्यामुळे अधिकार्‍यांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आपण बांगलादेशी नागरिक असल्याची कबुली त्याने दिली. तो १३ वर्षांपूर्वी मामा बादशाह याच्यासोबत बांगलादेशातून भारतात आला होता. दोन वर्ष कोलकाता येथे मजुरीचे काम केल्यानंतर तो पुण्यात कायमचा स्थायिक झाला. तेव्हापासून तो वाकडच्या मराठी स्कूलसमोरील मिल क्रमांक ३९२ मध्ये वास्तव्यास होता. याचदरम्यान त्याने बनावट कागदपत्र बनवून २०१४ साली पुण्यातून उस्मान किरमत सिद्धीकी या नावाने भारतीय पारपत्र मिळविले होते. या पारपत्रावर जून २०१६ रोजी तो सौदी अरेबिया येथे नोकरीसाठी गेला.

हेही वाचा >>> ज्ञानराधा मल्टिस्टेट कोऑपरेटीव्ह सोसायटी प्रकरण : नवी मुंबई, पुण्यासह राज्यभर ईडीचे छापे; एक कोटी २० लाखांची मालमत्ता जप्त

सप्टेंबर २०२२ मध्ये भारतात आल्यानंतर सात महिन्यानंतर म्हणजे एप्रिल २०२३ रोजी तो पुन्हा सौदी अरेबियाला गेला. त्यानंतर तो मार्चमध्ये परत भारतात आला होता. त्याला पुन्हा सौदी अरेबियाला नोकरीसाठी जायचे होते. त्यासाठी तो शनिवारी रात्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. मात्र तो बांगलादेशी असल्याचे उघडकीस येताच त्याला पुढील चौकशीसाठी सहार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. याप्रकरणी इमिग्रेशन अधिकारी भरत दिनकर चिंदगे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मोहम्मद ओसमानविरुद्ध बनावट भारतीय पारपत्र बाळगून भारत – सौदी अरेबिया दरम्यान प्रवास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे. आरोपीचे बांगलादेशात नियमित येणे – जाणे असल्याचा पोलिसांना संशय आहे. याबाबत सहार पोलीस अधिक तपास करीत आहेत. तसेच आरोपीला पारपत्र बनवण्यात कोणी मदत केली याचाही तपास सुरू आहे.