मुंबई : एका ऑनलाइन फसवणुकीत १.२५ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम गमावलेल्या मुंबईतील रहिवाशाने दाखल केलेली तक्रार ग्राहक आयोगाने नुकतीच फेटाळून लावली. तक्रारदाराने स्वतःच फसवणूक करणाऱ्यांसह वन-टाइम पासवर्ड (ओटीपी) शेअर केला होता आणि अशा परिस्थितीत बँकेला दोष दिला जाऊ शकत नाही, असे आयोगाने नमूद केले आहे.

अध्यक्ष प्रदीप कडू आणि सदस्य गौरी एम. कापसे यांचा समावेश असलेल्या जिल्हा ग्राहक वाद निवारण आयोगाने (उपनगर) तक्रारदार फसवणुकीला बळी पडला हे मान्य केले. परंतु, नुकसान ग्राहकाच्या निष्काळजीपणामुळे झाले असेल, तर संपूर्ण नुकसान ग्राहकाला स्वतःच सोसावे लागेल हे रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) स्पष्ट केल्याचा दाखलाही आयोगाने तक्रारदाराला दिलासा नाकारताना दिला.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, जानेवारी २०२२ मध्ये नेटफ्लिक्सच्या सबस्क्रिप्शनचे नूतनीकरण करण्याचा प्रयत्न करत असताना, त्याने त्याच्या ई-मेलवर आलेल्या एका लिंकवर क्लिक केले. तो ई-मेल नेटफ्लिक्सकडून आलेला नाही हे लक्षात न आल्याने, त्याने त्यावर क्लिक केले आणि आपले कार्ड तपशील व एचडीएफसी बँकेकडून मिळालेला ओटीपी भरला. काही सेकंदातच, त्याला बँकेकडून १ लाख २५ हजार ६६५ रुपयांच्या व्यवहाराची पुष्टी करणारा संदेश आला.

सबस्क्रिप्शनची रक्कम फक्त ७९९ रुपये होती. त्यामुळे, आपण सायबर फसवणुकीचे बळी ठरल्याचे लक्षात आल्यावर तक्रारदाराने तात्काळ बँक तसेच पोलिसांच्या सायबर विभागाशी संपर्क साधला. तक्रारदाराने केलेला व्यवहार हा सुरक्षित पद्धतीने, ओटीपी प्रमाणित केल्यानंतर झाला होता. ओटीपी गोपनीय असतो आणि केवळ कार्डधारकालाच माहीत असतो, असे नमूद करून बँकेने तक्रारदाराची तक्रार बंद केली.

एचडीएफसी बँकेच्या उत्तरावर समाधानी न झाल्याने, तक्रारदाराने ग्राहक आयोगाकडे धाव घेतली. तसेच, पैशांची अवैध उचल बँकेच्या निष्काळजीपणामुळे झाली असून त्यांच्या सेवेत त्रुटी होती, असा दावा केला. तर, तक्रारदाराने स्वतःच एका बनावट लिंकवर क्लिक केले होते आणि सर्व तपशील त्याच्या क्रेडेन्शियल्सशी जुळल्यामुळे ओटीपी तयार झाला होता. परिणामी, बँकेकडे व्यवहार नाकारण्याचे कोणतेही कारण नव्हते, असा युक्तिवाद बँकेतर्फे आयोगापुढे करण्यात आला.

आयोगानेही आदेशात तक्रारदाराची फसवणूक झाल्याचे मान्य केले, त्याचवेळी, तक्रारदाराने स्वतःच फसवणूक करणाऱ्यांसह “गोपनीय क्रेडेन्शियल्स ” (ओटीपी) शेअर केले होते याकडे लक्ष वेधले. नुकसान ग्राहकाच्या निष्काळजीपणामुळे झाले असेल, तर संपूर्ण नुकसान ग्राहकाला स्वतःच सोसावे लागेल, असे या संदर्भातील रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्टपणे नमूद केल्याचे न्यायालयाने अधोरेखीत केले. तसेच, बँकेच्या सेवेमध्ये कोणतीही त्रुटी नसल्याचा निर्वाळा देऊन ग्राहक आयोगाने तक्रारदाराची याचिका फेटाळली.