मुंबई : प्रतिबंधित तंबाखूजन्य प्रकरणात झालेल्या कारवाईची प्रक्रिया, अधिकाऱ्यांची भूमिका आणि प्रशासकीय कार्यपद्धतीतील कथित अनियमितता प्रकरणात राज्य सरकारने शुक्रवारी अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या चार अधिकाऱ्यांवर निलंबनाची  कारवाई केली. तर अन्य २१ अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी सुरू केली आहे.

ठाणे येथील मे. हाय स्ट्रीट इम्पेक्स आणि मावळ तालुक्यातील मे. सोएक्स इंडिया प्रा. लि. या कंपन्यांवर केलेल्या कारवाईत अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची अत्यंत गंभीर अनियमितता आढळून असल्याने आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या प्रकरणाची चौकशी केली होती.  या चौकशीअंती अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे  चार अधिकारी निलंबित करण्यात आले.

निलंबनाची कारवाई झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये अन्न सह आयुक्त दिगंबर भोगावडे, अन्न सहायक आयुक्त यदुराज दहातोंडे, अन्न सुरक्षा अधिकारी अशोक इलागेर आणि सी. आर. स्वामी यांचा समावेश आहे.

दोन्ही प्रकरणांशी संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेचा आढावा घेऊन सरकारने प्रशासकीय शिस्तभंगाची प्रक्रिया सुरू केली आहे. विभागाच्या  २१ अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे. या चौकशीत संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका, कारवाईची कायदेशीर वैधता, अधिकारक्षेत्र आणि प्रशासकीय आदेशांचे पालन यांची तपासणी केली जाणार आहे.

‘अन्न सुरक्षा  तसेच सार्वजनिक आरोग्याशी संबंधित विषयांमध्ये कारवाई करताना कायद्याचे पालन आणि प्रशासकीय उत्तरदायित्व यांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल’ – नरहरी झिरवाळ, मंत्री, अन्न आणि औषध प्रशासन