मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बारामती मतदारसंघातील पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच काँग्रेसने ही पोटनिवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस लढणार असल्यास ही निवडणूक होऊ शकते. यामुळेच काँग्रेसने मोठे मन दाखवावे असे आवाहन भाजप नेते, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी क केले आहे.

बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसला महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्ष आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची साथ मिळाली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडूनही या निवडणुका लढण्यास हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. राहुरी आणि बारामती विधानसभेबाबत पक्षश्रेष्ठींसोबत बोलणे झाले आहे. यासाठी आमच्याकडे उमेदवारी मागणारे अर्ज आले आहेत. बारामतीसाठी सहा अर्ज आले आहेत आणि राहुरीमध्ये चार अर्ज आले आहेत. दोन दिवसांत याविषयी भूमिका जाहीर करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगिले.

यासंदर्भात महाविकास आघाडीतील मित्रपक्ष राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना (ठाकरे) या दोन्ही पक्षांच्या श्रेष्ठींशीही याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. यामुळे बारामतीत निवडणूक लढण्यावर काँग्रेस ठाम असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) नेत्या सुप्रिया सुळे यांनी बारामतीची पोटनिवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले आहे.

काँग्रेसने मोठे मन दाखवावे – चंद्रशेखर बावनकुळे

यावर भाजप नेते बावनकुळे यांनी काँग्रेस नेत्यांना अजित पवार यांचा दीर्घ काळ सहवास लाभला आहे. काँग्रेस असो की कोणत्याही पक्षाचा माणूस त्यांच्याकडे गेला तरी अजित पवार त्यांचे काम करत होते. अजित पवार यांचीच ही जागा आहे. आयुष्यभरातील राजकारणात ७५ टक्के काळ त्यांनी काँग्रेस नेत्यांसोबत घालवला आहे. त्यामुळे राहुरीमध्ये लढायचे असेल तर त्यांनी लढावे, मात्र बारामतीमध्ये आमच्या वहिनी सुनेत्रा पवार यांची निवडणूक आहे. अजित पवार यांची आठवण अजूनही आपल्या सोबत आहे. त्यांना जाऊन वर्षही झालेले नाही. त्यामुळे किमान या निवडणुकीच्या माध्यमातून तरी काँग्रेसने आपले मोठे मन दाखवावे, असे आवाहन केले.