मुंबई : अमेरिका – इराण युद्धामुळे आखाती देशांना होणाऱ्या बासमती तांदळाच्या निर्यातीला फटका बसला आहे. आखाती देश भारताच्या बासमतीचे प्रमुख आयातदार आहेत. पण, युद्धामुळे गतवर्षाच्या तुलनेत निर्यात पाच टक्क्यांनी घटली आहे, दुसरीकडे अमेरिकेसह युरोपीयन देशांना होणाऱ्या बिगर बासमतीच्या निर्यातीत वाढ झाल्यामुळे एकूण तांदळाच्या निर्यातीत वृद्धी झाली आहे.
‘अपेडा’ने दिलेल्या माहितीनुसार, गतवर्षी चीनला मागे टाकून भारताने तांदूळ उत्पादनात आघाडी मिळवली आहे. बासमती निर्यातीत घट झाली असली तरीही बिगर बासमती तांदळाच्या मागणीमुळे जागतिक बाजारपेठेत भारताचे वर्चस्व कायम राहिले आहे. यंदाच्या जानेवारी ते जून या सहा महिन्यांमध्ये तांदळाच्या निर्यातीमध्ये पाच टक्के वाढ झाली आहे.
गतवर्षी याच काळात भारतातून ११६.८ लाख टन तांदूळ निर्यात झाली होती आणि यंदा १२२.७ लाख टन निर्यात झाली आहे. अमेरिका – इराण युद्धामुळे आखाती देशांत तणाव असताना, वाहतूक विस्कळीत झाली असतानाही निर्यातीत आघाडी कायम ठेवून पाच टक्क्यांची वाढ झाली आहे. जागतिक तांदूळ बाजारात मुख्यतः थायलंड, व्हिएतनाम आणि पाकिस्तान भारताचे स्पर्धक आहेत. या तिन्ही देशांनी मिळून जितकी निर्यात केली आहे, तेवढी निर्यात एका भारतातून झाली आहे. साधारणत: जागतिक तांदूळ बाजारात भारताचा वाटा ४० टक्क्यांहून जास्त राहिला आहे.
उत्पादन वृद्धीमुळे दराच्या स्पर्धेत भारत सरस
गतवर्षी जागतिक एकूण तांदूळ उत्पादन सुमारे ५.४५५ लाख टनांवर पोहोचले होते. भारत चीनला मागे टाकून जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश बनला होता. भारतात १,५४० लाख टन तर चीनमध्ये १,४६० लाख टन उत्पादन झाले होते. विक्रमी उत्पादनामुळे देशांतर्गत दर स्थिर आणि कमी राहिले, त्यामुळे जागतिक बाजारात कमी दराने तांदूळ निर्यात करणे शक्य झाले. परिणामी निर्यातीत आघाडी घेता आली. भारताच्या तुलनेत थायलंड, व्हिएतनाम आणि पाकिस्तानच्या तांदळाचे दर जास्त राहिल्यामुळे देशातून निर्यात वाढली. आखाती युद्धामुळे बासमतीच्या निर्यातीत पाच टक्क्यांची घट होऊन ३७ लाख टन निर्यात झाली. तर बिगर बासमतीच्या निर्यातीत नऊ टक्क्यांनी वाढ होऊन ८५.७ लाख टन निर्यात झाली आहे. बिगर बासमती निर्यात अमेरिका, युरोपसह बांगलादेश, आफ्रिका, कॅमेरॉन, श्रीलंकेला झाली आहे.
सरकारने तत्काळ हस्तक्षेप करण्याची गरज
आखाती युद्धामुळे वाहतुकीत अडथळे आले आहेत. कंटेनर उपलब्ध नाहीत, कंटेनरचे भाडे तीन – चार पटीने वाढले आहे. त्यामुळे निर्यात महागली आहे. वाढीव दराने तांदूळ निर्यात करणे किफायतशीर ठरत नाही, त्यामुळे निर्यात संकटात सापडली आहे. पुढील काही महिने अशी परिस्थिती राहिली निर्यातीवर परिणाम होईल. केंद्र सरकारने तत्काळ हस्तक्षेप करण्याची गरज आहे, अशी माहिती तांदूळ निर्यातदार राजेश शाह यांनी दिली.
