scorecardresearch

शिवसेनेच्या वाटेला जाणारे इतिहासजमा झाले; सेनेचा खडसेंना टोला

शिवसेनेला महाराष्ट्रातील त्यांच्या ताकदीची जाणीव करून द्यावी, यासाठी खडसे यांनी पुढाकार घेतला होता.

Political Battle, shivsena , eknath Khadse, Shivsena, BJP, Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
शिवसेनेशी युती तोडल्याचा खडसे यांनी आनंद व्यक्त केला. पण या आनंदावर खूप लवकर विरजण पडेल असे खडसेंनाही वाटले नसेल, असा टोलाही हाणला आहे.

विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेशी दोन हात करण्यात आघाडीवर असलेल्या एकनाथ खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर सेनेकडून सातत्याने लक्ष्य करण्यात येत आहे. शिवसेनेच्या वाट्याला जाणारे कशाप्रकारे इतिहासजमा झाले, असे सांगत ‘सामना’च्या अग्रलेखातून खडसेंच्या जखमेवर पुन्हा एकदा मीठ चोळण्याचे काम सेनेने केले आहे.
शिवसेनेबरोबर युती तोडण्याचा निर्णय आपणच कसा हिमतीने कळवला या कृतीचा अभिमान खडसे यांच्या चेहर्‍यावर शेवटपर्यंत दिसत होता. जे शिवसेनेच्या वाटेला गेले ते एकतर आडवे झाले किंवा तुरुंगात गेले, असे इतिहास सांगतो. शिवसेनाद्वेषातून मिळवलेली सत्ता म्हणजे बुडबुडेच ठरतात. हे बुडबुडे फुटू लागले आहेत, अशी टीका अग्रलेखात करण्यात आली आहे.
खडसेप्रकरणी सेनेच्या भूमिकेने भाजपमध्ये संताप!
या कालच्या पोराला म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांना काय कळतेय! मी म्हणजेच सरकार असे जळगावच्या नाथाभाऊंना वाटत होते. पण या कालच्या पोराने फटाक्यात दारू कधी ठासली ते समजलेच नाही. ज्येष्ठ म्हणून नितीन गडकरी यांनी दिल्लीचा निरोप नाथाभाऊंना देण्याचे काम तेवढे केले. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे शेवटच्या क्षणापर्यंत एकनाथ खडसे निष्कलंक व निर्दोष असल्याचा राग आळवीत होते; पण दिल्लीला राग आल्याने दानव्यांचे दानही उलटे पडले. प्रश्‍न इतकाच आहे की, रावसाहेब दानव्यांपासून संपूर्ण भारतीय जनता पक्षाला वाटत होते की, खडसे यांच्यावरील आरोप साफ खोटे आहेत, हा त्यांच्याविरुद्धचा बनाव आहे, त्यांचे सरळ सरळ चारित्र्यहनन आहे. मग या निर्दोष व निष्कलंक माणसाला वाचवण्याची हिंमत दाखवायची सोडून त्यांचा राजीनामा घेण्याचा पळपुटेपणा का दाखवला, खडसे यांच्या निर्दोषत्वाचा घंटानाद करण्यासाठी मुख्यमंत्री पुढे का सरसावले नाहीत, असा सवालही अग्रलेखात उपस्थित करण्यात आला आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांची युती होऊ नये, यासाठी आग्रही असलेल्या नेत्यांमध्ये एकनाथ खडसे आघाडीवर होते. युतीच्या राजकारणावर फुली मारली जावी आणि शिवसेनेला महाराष्ट्रातील त्यांच्या ताकदीची जाणीव करून द्यावी, यासाठी खडसे यांनी पुढाकार घेतला होता. जागावाटपाच्या चर्चेतही शिवसेनेशी कोणतीच तडजोड होऊ नये यासाठी खडसे आग्रही होते आणि युती तुटल्याची घोषणा करण्याचे कामही त्यांनी खुशीने अंगावर घेतले होते. फडणवीस सरकारमध्ये शिवसेना सहभागी झाल्यानंतरही, खडसे यांचा सेनाविरोध कायम होता. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजप-सेना युती होणार नाही, असेही खडसे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याच्या काही दिवस अगोदर जाहीर करून टाकले होते. खडसे आणि शिवसेना यांच्यातील वादात उद्योग खात्याच्या अखत्यारीतील महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या भोसरी येथील जमिनीच्या प्रकरणाची फोडणी पडल्यानंतर शिवसेनेने त्याचा वचपा काढून खडसे यांच्यावर नेम साधला. ती जमीन एमआयडीसीचीच असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी जाहीर केल्याने फडणवीस सरकारची कोंडी झाली व खडसे एकाकी पडले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-06-2016 at 07:33 IST
ताज्या बातम्या