आगामी लोकसभा निवडणुकीत बीडमधून भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात कोणी लढायचे यावरून राष्ट्रवादीमध्ये आतापासूनच जोरदार रण माजले आहे. जिल्ह्य़ाचे पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी ही जागा लढवावी अन्यथा त्यांचे पालकमंत्रीपद काढा, अशी थेट मागणी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे करीत जिल्हयातील स्वपक्षीय आमदारांनी पालकमंत्र्यांविरोधात दंड थोपटल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
बीडमध्ये मुंडेना धक्का देण्याची रणनीती राष्ट्रवादीकडून आखली जात आहे. बीड लोकसभा मतदारसंघाची चाचपणी करण्यासाठी अजित पवार यांच्या निवासस्थानी शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पक्षातील अंतर्गत कलह उफाळून आला. या बैठकीस जयदत्त क्षीरसागर यांच्यासह मदत व पुनर्वसन राज्यमंत्री सुरेश धस, आमदार विनायक मेटे, धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, अमरसिंह पंडित, पृथ्वीराज साठे आणि अक्षय मुंडे आदी उपस्थित होते. त्यावेळी क्षीरसागर यांनीच खासदारकीची निवडणूक लढवावी असा आग्रह धरण्यात आला. त्यांना मुंडे यांच्यासमोर लढायचे नसेल तर धस निवडणूक लढविण्यास तयार आहेत. मात्र त्यांना पालकमंत्रीपद द्या, अशी जोरदार मागणी या आमदारांनी क्षीरसागर यांच्यासमोरच केल्याने खुद्द पवारही अवाक झाले. त्यावर संतप्त झालेल्या क्षीरसागर यांनीही आपण पक्षाचा आदेश मानणारे आहोत, आजवर पक्षाशी एकनिष्ठ आहोत. मात्र बाहेरून आलेल्यांनी आपल्याला शिकवू नये, असे सांगत विरोधकांचा प्रत्युत्तर दिल्याने काहीसा तणाव निर्माण झाल्याचे कळते.