मुंबई : राज्यात सत्ताबदल झाल्यावर भाजपने संघटनात्मक पातळीवर बदल करताना प्रदेशाध्यक्षपदी माजीमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, तर मुंबई अध्यक्षपदी आमदार आशीष शेलार यांची शुक्रवारी नियुक्ती केली. मुंबई महानगरपालिका जिंकून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का देण्याचा निर्धार केलेल्या भाजपने शेलार यांच्याकडेच पुन्हा मुंबईची सूत्रे सोपविली आहेत.

भाजपचे मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, तर मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्याने दोन्ही पदांवर नव्याने नियुक्त्या होणार हे निश्चित होते. त्यानुसार प्रदेशाध्यक्षपदी नागपूरचे बावनकुळे, तर मुंबई अध्यक्षपदी शेलार यांच्या नियुक्तीची घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी नवी दिल्लीत केली.  बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करून पक्षाने ओबीसी समाजातील नेत्याला संधी दिली आहे. आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी करण्याचे आव्हान बावनकुळे यांच्यासमोर आहे.

Chandrashekhar Bawankule
औषधी संचावर पंतप्रधानांचा फोटो का नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचा पुण्यातील पदाधिकाऱ्यांना प्रश्न
Wrong campaign, gangster type people
कल्याण पूर्वेत गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून खासदार शिंदेंचा अपप्रचार, भाजपच्या वरिष्ठांनी दखल घेण्याची जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांची मागणी
bharti kamdi marathi news, bharti kamdi palghar latest news in marathi
जिल्हा परिषद अध्यक्ष भूषविलेल्या भारती कामडी यांच्यापुढे आता लोकसभेचे आव्हान
Chandrapur
चंद्रपूर : जिल्हा बँकेचे अध्यक्ष रावत व आमदार धानोरकर यांच्यात बंदद्वार चर्चा, दोन्ही नेत्यांमध्ये होते राजकीय वितुष्ट

उमेदवारी नाकारल्याची भरपाई?

चंद्रशेखर बावनकुळे हे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय मानले जातात. फडणवीस सरकारमध्ये ते पाच वर्षे ऊर्जामंत्री होते. परंतु २०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने बावनकुळे यांना उमेदवारी नाकारली होती. त्याबद्दल बरीच उलटसुलट चर्चा झाली होती. एका बडय़ा उद्योगपतीच्या दबावामुळे बावनकुळे यांची उमेदवारी कापली गेल्याची कुजबूज होती. पक्ष नेतृत्वाची बावनकुळे यांच्यावर एवढी खप्पामर्जी झाली होती की, त्यांच्या पत्नीलाही उमेदवारी देण्यास नकार देण्यात आला होता. बावनकुळे यांना उमेदवारी नाकारल्याचा फटका नागपूरमध्ये भाजपला बसला होता. विधानसभा निवडणुकीत शहर भागात पक्षाच्या आमदारांचे संख्याबळ घटले, तर नागपूर जिल्हा परिषदेची सत्ता पक्षाला गमवावी लागली. बावनकुळे यांच्यामुळे नागपूर आणि आसपास लक्षणीय मते असलेला तेली समाज विरोधात गेल्याचे बोलले जात होते. हे लक्षात घेऊनच भाजपने गेल्या वर्षी त्यांना विधान परिषदेची आमदारकी देऊन अधिक नुकसान होणार नाही याची खबरदारी घेतली होती. बावनकुळे १९९७ आणि २००२ मध्ये नागपूर जिल्हा परिषदेत निवडून आले होते. २००४ ते २०१९ या काळात त्यांनी विधानसभेत कामठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते.

शेलारांवर तिसऱ्यांदा जबाबदारी

फडणवीस सरकारच्या अखेरच्या काळात शिक्षणमंत्रीपद भूषवलेल्या आशीष शेलार यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. मंत्रिमंडळात समावेश झाला नसला तरी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाईल, असा अंदाज वर्तविला जात होता. पण पक्षाने शेलार यांची तिसऱ्यांदा मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. मुंबई महानगरपालिका कोणत्याही परिस्थितीत जिंकायचीच, असा भाजपचा निर्धार आहे. त्यासाठीच शेलार यांच्याकडे महापालिका निवडणुकीपर्यंत मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी राहण्याची शक्यता आहे. २०१३ पासून २०२० पर्यंत त्यांनी मुंबई भाजपचे लागोपाठ दोनदा अध्यक्षपद भूषविले आहे. २०१७ मध्ये मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने स्वबळावर ८३ जागा जिंकून शिवसेनेच्या तोंडाला अक्षरक्ष: फेस आणला होता. शेलार यांच्या संघटन कौशल्यामुळेच भाजपने ३३ संख्येवरून मोठी झेप घेतली होती. शिवसेनेपेक्षा केवळ दोन जागा भाजपला कमी मिळाल्या होत्या. महापालिकेतील भ्रष्टाचार आणि शिवसेनेच्या गैरकारभाराच्या विरोधात शेलार यांनी सातत्याने आवाज उठविला होता. त्याचा भाजपला चांगलाच फायदा झाला होता. गेल्या अडीच वर्षांत शेलार यांनी महाविकास आघाडी आणि विशेषत: मुंबईतील शिवसेनेच्या महापालिकेतील कारभारावर टीकेचा भडिमार केला होता. राज्याची सत्ता, शिवसेनेत पडलेली फूट हे सारे मुद्दे शेलार यांच्या पथ्यावर पडणारे आहेत.

जातीय समीकरण

विधिमंडळ पक्षनेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नवे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे दोघेही नागपूरचे आहेत. पक्षाने विदर्भ आणि त्यातही नागपूरला झुकते माप दिले आहे. फडणवीस, बावनकुळे आणि शेलार यांच्या नियुक्तीच्या माध्यमातून भाजपने ब्राह्मण, इतर मागासवर्ग (ओबीसी) आणि मराठा असे जातीय समीकरण साधले आहे. बावनकुळे आणि शेलार यांच्या नियुक्त्यांमध्ये फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे स्पष्ट आहे.

आव्हाने..

चंद्रशेखर बावनकुळे : राज्यात आलेल्या सत्तेच्या पार्श्वभूमीवर आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी करणे.

आशीष शेलार : शिवसेनेतून फुटून एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र गट स्थापन केल्याने मुंबई महापालिका निवडणूक जिंकून खचलेल्या शिवसेना नेतृत्वाला आणखी एक धक्का देणे, महापालिकेत  सत्ता आणणे.     

महापालिका, जिल्हा परिषद आणि विधानसभेच्या निवडणुका भाजप आणि एकनाथ शिंदे गट एकत्र लढवेल. आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातून भाजप आणि शिंदे गटाचे मिळून ४५ हून अधिक खासदार निवडून आणण्याची जबाबदारी पार पाडू.

चंद्रशेखर बावनकुळे, नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष, भाजप

रखडलेला सागरी मार्ग, आरेमधील मेट्रो कारशेडला झालेला विरोध, रस्त्यांवरील खड्डे, विविध खरेदींमधील भ्रष्टाचार यांपासून मुंबईकरांना सुटका हवी आहे. ठरावीक कंत्राटदार पोसणाऱ्यांना महापालिकेतून तडीपार करण्याची मुंबईकरांची इच्छा पूर्ण होईल.

– आशीष शेलार, अध्यक्ष, मुंबई, भाजप