मुंबई : बीबीए, बीएमएस, बीबीएम आणि एकात्मिक एमबीए अभ्यासक्रमांच्या तिसऱ्या प्रवेश यादीत ४ हजार ६१९ पैकी ४ हजार ३३० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. त्यापैकी तब्बल ४ हजार १०३ विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले असून, ही संख्या प्रवेशाच्या संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या सुमारे ९५ टक्के आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्षाने २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी बीबीए, बीएमएस, बीबीएम आणि एकात्मिक एमबीए अभ्यासक्रमांची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेतील तिसरी यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. तिसऱ्या फेरीत ४ हजार १०३ विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे प्रवेश गोठवण्यात आले आहेत. पसंतीचे महाविद्यालय मिळाल्याने या विद्यार्थ्यांना त्याच महाविद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक आहे. काही कारणाने प्रवेश नाकारल्यास त्यांना पुढील चौथ्या फेरीत सहभागी होता येणार नाही. अशा विद्यार्थ्यांना थेट त्यानंतरच्या संस्थात्मक फेरीत सहभागी होता येईल.
तिसऱ्या फेरीत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना २८ ते ३० ऑगस्टदरम्यान संबंधित महाविद्यालयात प्रत्यक्ष हजर राहून आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. तसेच शुल्क भरून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.
दोन फेऱ्यांत ११,९१९ प्रवेश
बीबीए, बीएमएस, बीबीएम आणि एकात्मिक एमबीए अभ्यासक्रमांच्या पहिल्या दोन प्रवेश फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. या दोन्ही फेऱ्यांमध्ये आतापर्यंत ११ हजार ९१९ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित केला आहे. तिसऱ्या फेरीतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ३१ ऑगस्ट रोजी चौथ्या फेरीसाठीच्या तात्पुरत्या रिक्त जागा जाहीर करण्यात येणार आहेत.
