मुंबई : बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत ना.म.जोशी मार्ग, नायगाव आणि वरळीतील पुनर्वसित इमारतीतील घरांसाठी बुधवारी २० ऑक्टोबरला ऑनलाइन सोडत काढण्यात येणार आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता म्हाडा भवनातील गुलझारीलाल नंदा सभागृहात ही सोडत होणार असून एका चाळीतील केवळ पाच सदस्यांना ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ तत्त्वावर सोडतीसाठी उपस्थित राहता येईल.

बीडीडी प्रकल्पातील पात्र रहिवाशांना पुनर्वसित इमारतीत कोणत्या मजल्यावर आणि कोणते घर मिळणार हे ठरविण्यासाठी पुनर्वसित इमारती बांधून पूर्ण होण्याआधीच सोडत काढण्याचा निर्णय घेण्यात आला. रहिवाशांना हक्काच्या घराची हमी देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार काही महिन्यांपूर्वी ना.म. जोशी मार्ग येथील २७२ पात्र रहिवाशांना सोडतीद्वारे घराची हमी देण्यात आली आहे. ही सोडत झाल्यानंतर घरांची ऑनलाइन नोंदणी करत सोडतीतील पात्र रहिवाशांना करारपत्र वितरित करण्यात येणार आहे.

 २७२ घरांची सोडत झाल्यानंतर वरळी, ना.म.जोशी आणि नायगावमधील पात्र रहिवाशांनाही घराची हमी देण्यासाठी सोडत काढण्याची तयारी केली. मात्र बीडीडीतील पुनर्वसित इमारतीतील घरांसाठी केवळ एक हजार रुपये मुद्रांक शुल्क आकारण्याचा अध्यादेश जारी होत नसल्याने ही सोडत रखडली होती. पण मागील आठवडय़ात यासंबंधीचा अध्यादेश जारी झाला आहे.