मुंबई : वरळी, ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव येथील बीडीडी चाळीतील रहिवाशांना अखेर राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. बीडीडीतील रहिवाशांच्या तात्पुरत्या स्थलांतरासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून दरमहा २५ हजार रुपये घरभाडे दिले जात होते. मात्र, आता त्यात वाढ करण्यात आली असून रहिवाशांना दरमहा २५ हजार रुपयांऐवजी ३० हजार रुपये घरभाडे दिले जाणार आहे. ऑगस्टपासून नवीन घरभाडे लागू होणार असून, यासंबंधीचा शासन निर्णय गृहनिर्माण विभागाने प्रसिद्ध केला आहे.

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून वरळी, ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास मार्गी लावला जात आहे. या पुनर्विकासाअंतर्गत १५ हजारांहून अधिक बीडीडीवासियांचे पुनर्वसन करून त्यांना ५०० चौ. फुटाची घरे दिली जाणार आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात पुनर्वसित इमारतींची कामे वेगाने सुरू असून, जसजशा इमारती पूर्ण होत आहेत, तसतसा घरांचा ताबा रहिवाशांना दिला जात आहे.

पुनर्विकासाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांना गती देण्यासाठी रहिवाशांचे तात्पुरते स्थलांतर करून इमारती रिकाम्या करणे आवश्यक आहे. मात्र, मुंबई मंडळाकडे सध्या रहिवाशांच्या स्थलांतरासाठी संक्रमण शिबिरांतील पुरेसे गाळे उपलब्ध नाहीत. सध्या मंडळाकडे केवळ २,५०० गाळे उपलब्ध असून ते अपुरे आहेत. त्यामुळे इमारती रिकाम्या करून घेण्याचे मोठे आव्हान मंडळासमोर उभे राहिले होते. या समस्येवर तोडगा म्हणून रहिवाशांना घरभाड्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निर्णयानुसार रहिवाशांना दरमहा २५ हजार रुपये घरभाडे दिले जात होते.

वरळी, नायगाव परिसरात घरभाडे आवाक्याबाहेर वरळी, ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव परिसरातील घरभाड्याच्या तुलनेत ही रक्कम अपुरी ठरत होती. २५ हजार रुपयांत भाड्याने घरे उपलब्ध होत नसल्याने रहिवाशांच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यामुळे घरभाड्याच्या रकमेत वाढ करण्याची मागणी तिन्ही चाळीतील रहिवाशांकडून सातत्याने केली जात होती.रहिवाशांच्या मागणीनुसार मुंबई मंडळाने घरभाडे वाढविण्याचा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी गृहनिर्माण विभागाकडे मान्यतेसाठी पाठविला होता. या प्रस्तावास गृहनिर्माण विभागाने मान्यता दिली आहे. या निर्णयानुसार आता रहिवाशांना दरमहा २५ हजार रुपयांऐवजी ३० हजार रुपये घरभाडे दिले जाणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचे ना. म. जोशी मार्ग बीडीडी पुनर्विकास समितीने स्वागत केले आहे.