मुंबई: म्हाडाच्या माध्यमातून वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळींचा पुनर्विकास होत आहे. वरळीच्या धर्तीवर नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडीवासीयांना एकास एक वाहनतळ (पार्किंग) देऊन हजारो रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी विधान परिषदेत करण्यात आली असता यावर तोडगा काढून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे अश्वासन मंत्री पंकज भोयर यांनी दिले.

शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी विधानपरिषदेत नियम ९३ अन्वये बीडीडीवासीयांचा वाहनतळाचा मुद्दा मांडला. वरळी बीडीडीवासियांना एकास एक पार्किंग दिली आहे. परंतु प्रकल्प एकच असताना देखील पार्किंगची सुविधा देताना नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील रहिवाशांवर अन्याय का? असा सवाल सुनील शिंदे यांनी केला. नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील रहिवाशांना स्वतंत्र पार्किंग दिले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी रहिवाशांना आश्वासन दिले होते, याची देखील आठवण त्यांनी करून दिली.

राज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले, विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार चार सदनिकांमागे एक पार्किंग देण्याची तरतूद आहे. रहिवाशांची मागणी आणि जागेची उपलब्धता विचारात घेता दोन सदनिकांमागे एक पार्किंग याप्रमाणे तिन्ही बीडीडी चाळींकरता नियोजन करण्यात आले. वरळी बीडीडी पुनर्विकास प्रकल्पात पुरेशी जागा असल्याने तिथे एकास एक पार्किंग देणे शक्य झाले; परंतु ना. म. जोशी आणि नायगाव या दोन्ही ठिकाणी पुरेसी जागा उपलब्ध नसल्यामुळे तिथे दोन सदनिकांमागे एक पार्किंग देण्यात आली आहे. यावर सुनील शिंदे आणि ॲड. अनिल परब यांनी आक्षेप घेत सरकारने ठरवले तर त्या ठिकाणी जागा शोधून एकास एक पार्किंग देता येऊ शकते, अशी भूमिका मांडली असता, बीडीडीवासीयांबाबत शासन सकारात्मक आहे. वरळीत पोडियम पार्किंग तर नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग बीडीडी पुनर्विकास प्रकल्पात तळघरातील वाहनतळ देण्यात आले आहे. ही तांत्रिक अडचण असली तरीदेखील यावर पुन्हा एकदा बैठक घेऊन योग्य तोडगा काढू, असे आश्वासन मंत्री पंकज भोयर यांनी दिले.