मुंबई : बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळीतील दोन पुनर्वसित इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले असून या इमारतींमधील ३४२ घरांसाठी निवासी दाखला (ओसी) प्राप्त झाला आहे. त्यामुळे या घरांचा ताबा सप्टेंबरअखेरीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्याचे म्हाडाच्या मुंबई मंडळाचे नियोजन होते. मात्र काही कारणाने घरांचा ताबा लांबणीवर पडला असून आता यासाठी नवरात्रोत्सवातील मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. त्याचवेळी आता ३४२ ऐवजी ५५७ घरांचा ताबा देण्यात येणार आहे. या प्रकल्पातील तिसरी पुनर्वसित इमारतही पूर्ण झाली असून या इमारतीतील २१५ घरांना आठवड्याभरात निवासी दाखला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई मंडळाने ५५७ घरांचा ताबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारने जुन्या, जीर्ण बीडीडी चाळींचा रखडलेला पुनर्विकास मार्गी लावण्याची जबाबदारी म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे सोपविली आहे. त्यानुसार शिवडी बीडीडी चाळ वगळून वरळी, ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे काम हाती घेण्यात आले. तिन्ही ठिकाणी पहिल्या टप्प्यातील पुनर्वसित इमारतींची कामे सुरू आहेत. जसजशा पुनर्वसित इमारती पूर्ण होत आहेत, तसतसा त्या इमारतींना निवासी दाखला घेऊन घरांचा ताबा रहिवाशांना दिला जात आहे. त्यानुसार वरळी आणि नायगावमधील रहिवाशांना तीन टप्प्यात, तर नायगावमधील रहिवाशांना दोन टप्प्यात घरांचा ताबा देण्यात आला. मात्र त्याचवेळी ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काच्या घराची, ५०० चौ. फुटांच्या घरात वास्तव्यास जाण्याची प्रतीक्षा आहे. महत्त्वाचे म्हणजे बीडीडी चाळ पुनर्विकासाला रहिवाशांचा विरोध असताना, घरे रिकामी केली जात नसताना ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळीतील रहिवाशांनी सर्वप्रथम प्रकल्पास समर्थन देत घरे रिकामी केली. मात्र असे असताना याच चाळीतील रहिवाशांची हक्काच्या घराची प्रतीक्षा लांबली आहे. येथील एकाही इमारतीतील घरांचा ताबा न दिल्याने रहिवाशांमध्ये नाराजी होती. घरांचे काम संथगतीने सुरू असल्याचा आरोप होत होता. रहिवाशांच्या नाराजीनंतर मुंबई मंडळाने कामाला वेग दिला आणि आता अखेर दोन पुनर्वसित इमारतींचे काम पूर्ण झाले आहे. या दोन पुनर्वसित इमारतीतील ३४२ घरांना निवासी दाखला प्राप्त झाला आहे.

पितृपक्षानंतरच घराचा ताबा देण्याची मागणी

दोन पुनर्वसित इमारतींतील ३४२ घरांना निवासी दाखला मिळाल्याने सप्टेंबरअखेरपर्यंत त्यांचा ताबा देण्याचे मंडळाचे नियोजन होते. त्यासाठी मुख्यमंत्र्यांची वेळ घेण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र आता सुरू असलेला पितृपक्ष संपल्यानंतरच घराचा ताबा द्यावा, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात आली. त्यामुळे या घरांचा ताबा नवरात्रोत्सवात देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता आणखी एक पुनर्वसित इमारत पूर्ण झाली असून या इमारतीतील २१५ घरांसाठी आठवड्याभरात निवासी दाखला मिळणार आहे. त्यामुळे आता ३४२ नव्हे, तर एकूण ५५७ घरांचा ताबा नवरात्रोत्सवात दिला जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. त्यामुळे ५५७ रहिवाशांचा दसरा-दिवाळी नवीन घरात साजरा होणार आहे.