मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून वरळी, नायगाव, ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळींचा पुनर्विकास वेगात सुरू आहे. या पुनर्विकासाअंतर्गत आतापर्यंत २७०० हून अधिक घरांचे काम पूर्ण झाले असून सध्या सात हजार घरांची कामे सुरू आहेत. तर उर्वरित ५ हजार घरांच्या कामाला जून २०२७ मध्ये सुरुवात होईल आणि सर्वच्या सर्व १५ हजार घरांची कामे २०३० मध्ये पूर्ण करण्याचे मुंबई मंडळाचे नियोजन आहे.
राज्य सरकारने जीर्ण बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची जबाबदारी मुंबई मंडळावर सोपविली आहे. त्यानुसार शिवडी वगळता ना. म. जोशी मार्ग, नायगाव आणि वरळीतील १५ हजार ५९३ रहिवाशांचे पुनर्वसन होणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टप्प्यात अंदाजे ३ हजार घरांचे काम पूर्ण करून यातील २७८४ घरांचा ताबा आतापर्यंत रहिवाशांना देण्यात आला आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये वरळीतील ५५६ रहिवाशांना सर्वप्रथम घरांचा ताबा देण्यात आला. त्यानंतर मे २०२६ मध्ये येथील आणखी ८२७ घरांचा ताबा देण्यात आला. तर नायगावमधील ८६४ घरांचा ताबा मार्च २०२६ मध्ये, तर ५३७ घरांचा ताबा जून २०२६ मध्ये देण्यात आला. ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळीतील पहिल्या टप्प्यातील अंदाजे ५५० घरांचा ताबा दिवाळीपर्यंत देण्याचे नियोजन आहे.
तिन्ही चाळींतील एकूण १५ हजार ५९३ घरांपैकी तीन हजार घरांचे काम पूर्ण झाले असून त्यातील २७०० हून अधिक घरांचा ताबा देण्यात आला. सध्या सात हजार घरांचे काम सुरू असून उर्वरित ५ हजार घरांचे काम जून २०२७ मध्ये पूर्ण होईल, अशी माहिती म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिली. ‘लोकसत्ता’ आयोजित आरटीसी अर्बन रिडेव्हलपमेंट परिषदेत ते बोलत होते. तर १५ हजार ५९३ रहिवाशांचे पुनर्वसन अर्थात बीडीडी प्रकल्प २०३० मध्ये पूर्ण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, या तिन्ही चाळींच्या पुनर्विकासातून विक्री घटकाअंतर्गत अंदाजे १४ लाख चौरस मीटर क्षेत्रफळ उपलब्ध होणार आहे. या क्षेत्रावर निवासी इमारतींसह काही व्यावसायिक इमारती बांधण्यात येणार आहेत. या क्षेत्रावरील अतिरिक्त घरांची विक्री सोडतीद्वारे केली जाणार आहे. पुनर्वसित इमारतींची कामे पूर्ण झाल्यानंतर विक्री घटकातील घरांच्या कामाला सुरुवात होणार आहे.
