मुंबई : बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत २०११ नंतर वास्तव्यास असणाऱ्या २२३ पोलीस शिपाई आणि हवालदारांना ५०० चौरस फुटांची घरे देण्याचा मार्ग अखेर सरकारी निर्णयामुळे मोकळा झाला आहे. मात्र, सरकारने निश्चित केलेल्या घरांच्या कोट्यवधी रुपयांच्या किमतींमुळे पोलिसांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुटण्याऐवजी अधिकच जटील बनला आहे.
वरळीतील घरासाठी तब्बल १ कोटी ४८ लाख, ना. म. जोशी मार्गासाठी ८६ लाख ३० हजार, तर नायगावमधील घरासाठी ७२ लाख २५ हजार रुपयांचा भुर्दंड या पोलिसांना सहन करावा लागणार आहे. पोलीस शिपाई आणि हवालदारांचे मर्यादित वेतन पाहता, इतकी प्रचंड रक्कम उभी करणे आणि त्यासाठी बँकांकडून गृहकर्ज मिळवणे जवळपास अशक्य आहे. परिणामी, ‘पात्र ठरूनही हक्काचे घर हवेतच विरणार का?’ असा हताश प्रश्न आता या पोलीस कुटुंबांसमोर उभा ठाकला आहे.
विशेष म्हणजे, याच बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात १ जानेवारी २०११ पूर्वीच्या पात्र पोलीस कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या वारसांना ही ५०० चौरस फुटांची घरे अवघ्या १५ लाख रुपयांत मिळाली असून, २०२६ मध्ये त्यांना घरांचा प्रत्यक्ष ताबाही देण्यात आला आहे.
दुसरीकडे, त्याच प्रकल्पात आणि तेवढ्याच क्षेत्रफळाच्या घरासाठी २०११ नंतरच्या पोलिसांना मात्र ७२ लाखांपासून ते थेट १ कोटी ४८ लाख रुपयांची प्रचंड किंमत मोजावी लागणार आहे. एकाच प्रकल्पात, एकाच पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या घरांच्या किमतीत अशी दुजाभाव करणारी तफावत का? असा संतप्त सवाल आता पोलीस कुटुंबीयांकडून उपस्थित केला जात आहे. घरांच्या किमती निश्चित करताना संबंधितांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप त्यांनी केला.
मुंबईसारख्या शहरात मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि वाढत्या महागाईचा खर्च सांभाळताना पोलीस शिपाई आणि हवालदारांना एवढी मोठी रक्कम भरणे शक्य नाही. सरकारने जुन्या पात्र पोलिसांप्रमाणेच १५ लाख रुपयांत घरे उपलब्ध करून द्यावीत आणि त्यासाठी सुधारित निर्णय काढावा, अशी मागणी घरासाठी पात्र रहिवाशी दत्तात्रय भापकर यांनी केली.
घरांच्या किमतीतील तफावतीचे समर्थन करताना म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी बांधकाम खर्च आणि इमारतींच्या पायाभूत सुविधांवरील खर्चानुसार दर निश्चित केल्याचे स्पष्ट केले. या इमारतींचे बांधकाम निविदा प्रक्रियेद्वारे करण्यात आले असून, प्रत्येक ठिकाणच्या इमारतींची उंची आणि बांधकामाचे स्वरूप वेगवेगळे आहे. उदाहरणार्थ, वरळीतील इमारती ४० मजल्यांच्या, तर नायगावमधील इमारती २६ मजल्यांच्या आहेत. त्यामुळे बांधकाम आणि पायाभूत सुविधांच्या खर्चात फरक पडतो. त्यानुसार घरांच्या किमती निश्चित करण्यात आल्याने दरांमध्ये तफावत दिसत असल्याचे बोरीकर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
परवडतील अशा दरांत घरे द्या
बांधकाम खर्चाच्या आधारे किंमत निश्चित करण्यामागील तांत्रिक कारणे वेगळी असली, तरी या किंमती पोलीस शिपाई आणि हवालदारांच्या आवाक्याबाहेर आहेत. केवळ बांधकाम खर्चाचा निकष न लावता पोलिसांची आर्थिक क्षमता आणि यापूर्वीच्या पात्र लाभार्थ्यांना दिलेल्या सवलतींचाही विचार करून सरकारने पुनर्विचार करावा आणि ही घरे पोलिसांना परवडतील अशा दरांत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भाजपचे आमदार आणि पोलिसांच्या घरासाठी पाठपुरावा करणारे कालिदास कोळंबकर यांनी केली आहे.
