beautification of all cities maharashtra government decision zws 70 | Loksatta

सर्व शहरांचे सौंदर्यीकरण; राज्य शासनाचा निर्णय

शहर सौंदर्यीकरण अभियान राबविताना स्थानिक संस्कृती, शहराची परंपरा व इतिहास जोपासली जाईल याची काळजी घ्यावयाची आहे.

सर्व शहरांचे सौंदर्यीकरण; राज्य शासनाचा निर्णय
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शहर सौंदर्यीकरण अभियान राबविण्यात येणार आहे. झोपडपट्टय़ा, गावठाणे यांची स्वच्छता व सुशोभीकरणही या अभियानांतर्गत करण्यात येणार आहे. विकासक, अभियांत्रिकी, कला महाविद्यालये, युवक, विद्यार्थी, महिला, कलाकार यांच्या सहभागातून हे अभियान राबविण्यात येणार आहे.

शहर सौंदर्यीकरण अभियानाच्या अंमलबजावणीसाठी महापालिका स्तरावर आयुक्त व नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांचा प्रमुख सहभाग असलेले कार्यगट स्थापन करण्याच्या सूचना नगरविकास विभागाने दिल्या आहेत. त्यात शहर अभियंता, नगर अभियंता, नगररचनाकार, आरोग्य , स्वच्छता अधिकारी, बांधकाम विकासक संघटनांचे प्रतिनिधी, इत्यादींचा समावेश असेल.

राज्यातील प्रत्येक शहरात हे अभियान राबविण्यात येणार आहे. शहरांतील अस्वच्छ जागांची निश्चिती करून त्याची स्वच्छता व सुशोभीकरण करणे, शहरातील मध्यवर्ती चौकाची स्वच्छता, सुशोभीकरण व जागेच्या उपलब्धतेनुसार तेथे भित्तीचित्रे, कारंजे, शिल्प उभारणी, सामाजिक संदेश देणारे व जनजागृती करणारे चित्र रेखाटणे, शहरांतील प्रमुख इमारती, शाळा, महाविद्यालये, वारसाहक्क इमारती यांच्याबाहेर समर्पक भित्तीचित्रे रेखाटणे, शहरातील भुयारी मार्ग, पादचारी उन्नत मार्ग, उड्डाणपूल यांचे सुशोभीकरण करम्ण्यात येणार आहे.

शहर सौंदर्यीकरण अभियान राबविताना स्थानिक संस्कृती, शहराची परंपरा व इतिहास जोपासली जाईल याची काळजी घ्यावयाची आहे. शहराच्या सुशेभीकरण व देखभालीसाठी खासगी संस्थांची मदत घेता येईल, तसेच सीएसआर निधी व लोकसहभागातून शहर सौंदर्यीकरणाची कामे करण्याचे ठरविण्यात आले आहे. सौंदर्यीकरणाच्या कामात प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळण्यास सांगण्यात आले आहे.

या अभियानासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांचा स्वनिधी वापरायचा आहे. या अभियानासंदर्भात नगरविकास विभागाने गुरुवारी तसा शासन आदेश जारी केला आहे.

सेल्फी पॉंइंट : शहर सौंदर्यीकरणाचा एक भाग म्हणून झोपडपट्टी व गावठाण परिसराची स्वच्छता करून त्यांचे सुशोभीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर शहरमंमध्ये आकर्षक सेल्फी पॉइंटची निर्मिती करण्यात येणार आहे. शहरांतील दुकानांवरील नामफलक हे साधारणत: एकाच प्रकारातील व रंगसंगतीतील करावे, जेणेकरून शहराच्या सौंदर्यीकरणात भर पटेल, याकडे लक्ष देण्यास सांगण्यात आले आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-07-2022 at 02:58 IST
Next Story
जम्बो रुग्णालये बंद ; केवळ सेव्हन हिल्स, सोमय्या जम्बो रुग्णालये सुरू राहणार