मुंबईच्या सौदर्यांत भर घालणारी बेटे, दुभाजक, पदपथ, आकाशमार्गिका, समुद्र किनारे, उद्याने यांच्या सुशोभीकरणाची कामे मुंबई महापालिकेने वेळेत पूर्ण करावी, असे आदेश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकी दरम्यान महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी बुधवारी मुंबईच्या सुशोभीकरणाचे नियोजन सादरीकरण केले.

मुंबई महापालिकेच्या हद्दीतील काही रस्त्यांचे काँक्रीटीकरण पुर्ण झाले असून ज्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण बाकी आहे ती कामे ऑक्टोबरपासून पुन्हा सुरु करणार असल्याची माहिती चहल यांनी दिली आहे. दरम्यान, रस्त्याचे काम चांगल्या गुणवत्तेचे झाले पाहिजे. तसेच, रस्त्यात खड्डे पडणार नाहीत याचीही दक्षता घेण्याचे आदेश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

मुंबई शहरातील विविध ठिकाणच्या दुभाजकांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. शहर, पश्चिम व पूर्व उपनगरातील दुभाजकांच्या मोकळ्या जागेत झाडे लावणे, बोधचिन्हे, सिग्नल यांची सजावट करणे अशी अनेक कामे पुढील तीन महिन्यात पूर्ण केली जाणार आहेत. मुंबईच्या सौंदर्यात आणखी भर पाडण्यासाठी मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवर विविध कलाकृती आणि शिल्प साकारण्यात येणार आहेत. त्याचबरोबर उद्याने पर्यटन स्थळे बनू शकतील यासाठी ग्लो उद्यान संकल्पना राबविली जाणार आहे. तसेच, वांद्रे किल्ला, वरळी किल्ला, गेट वे ऑफ इंडिया, एशियाटिक वाचनालय, माझगाव उद्यान, अफगाण चर्च याठिकाणी प्रकाश योजनेच्या माध्यमातून सुशोभीकरण केले जाणार आहे.