‘व्हायकॉम १८’ची ‘चकाचक मुंबई’

कलाकुसर केलेली १३ फिरती स्वच्छतागृहे मुंबईत सुरू

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

कलाकुसर केलेली १३ फिरती स्वच्छतागृहे मुंबईत सुरू

स्वच्छ आणि सुंदर तसेच हागणदारीमुक्त मुंबई करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून बृहन्मुंबई महापालिकेला ‘व्हायकॉम १८’ या मोठय़ा समूहाने सहकार्य करण्याचे ठरविले आहे. समूहातर्फे ‘चकाचक मुंबई’ या उपक्रमाअंतर्गत कलाकुसर केलेली तेरा फिरती स्वच्छतागृहे मुंबईत सुरू करण्यात आली आहेत. मुंबईत वांद्रे येथे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात त्याची सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमास खासदार पूनम महाजन, आमदार व ‘भाजप’च्या मुंबई शाखेचे अध्यक्ष अ‍ॅड. आशीष शेलार, महापालिका आयुक्त अजोय मेहता, व्हॉयकॉम १८चे अधिकारी सुधांशू वत्स आदी उपस्थित होते.

या वेळी बोलताना खासदार महाजन म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत अभियान’ या मोहिमेत व्हायकॉम १८ हा समूह सहभागी झाला आहे. कलात्मक रीतीने सजविलेल्या स्वच्छतागृहांचा वापर करण्याची सवय नागरिकांना लावण्यासाठी याचा चांगला उपयोग होईल.

अ‍ॅड. शेलार यांनी ‘व्हायकॉम १८ हा समूह या मोहिमेत सहभागी झाल्यामुळे ‘हागणदारी मुक्त मुंबई’ होण्यास नक्कीच हातभार लागेल, असे सांगितले. तर वत्स म्हणाले, सामाजिक जबाबदारी या नात्याने आम्ही या उपक्रमात सहभागी झालो आहोत. मेहता यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ‘चकाचक मुंबई’च्या पहिल्या टप्प्यात अंधेरी (पूर्व) येथील चार झोपडपट्टय़ांमधील २०० हून अधिक स्वच्छतागृहांचे नूतनीकरण केले जाणार आहे.

व्हॉयकॉम १८ ने तयार केलेल्या फिरत्या स्वच्छतागृहांच्या दर्शनी भागावर मुंबईची जीवनरेखा असलेली उपनगरी रेल्वे, बॉलीवूड, कोळी समाज यांची चित्रे रंगविण्यात आली आहेत. ही  चित्रे मुंबईकरांसाठी आकर्षण ठरणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Beautiful wall painting at public toilet