मुंबई : बी. एड. (जनरल व स्पेशल), बी.एड. (इलेक्ट), मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन (एमपीएड) व मास्टर ऑफ एज्युकेशन (एमएड) या अभ्यासक्रमासाठीची अर्ज नोंदणी प्रक्रिया २७ फेब्रुवारी रोजी संपली. या तिन्ही अभ्यासक्रमासाठी १ लाख १६ हजार १३ विद्यार्थांनी नाेंदणी केली आहे. मात्र अर्ज करताना विद्यार्थ्यांकडून काही चुका झाल्या असल्यास त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) ७ मार्चपर्यंत ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
बी. एड. (जनरल व स्पेशल), बी.एड. (इलेक्ट), एमपीएड व एमएड या अभ्यासक्रमासाठी १ लाख १६ हजार १३ विद्यार्थांनी नाेंदणी केली आहे. यामध्ये एमपीएड सीईटीसाठी २ हजार ५१६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. एमएड सीईटीसाठी ३ हजार ९५२ तर बी. एड. (जनरल व स्पेशल ), बी.एड. (इलेक्ट) या अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी १ लाख ९ हजार ५४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. नाेंदणी केलेल्या या विद्यार्थ्यांकडून अर्ज भरताना अनावधानाने काही चुका होण्याची शक्यता असते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी त्या चुका दुरुस्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय सीईटी कक्षाने घेतला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना ७ मार्चपर्यंत अर्जामध्ये ऑनलाईन पद्धतीने दुरुस्ती करता येणार आहेत. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या लॉगीनमध्ये जाऊन ही दुरुस्ती करावयाची आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या अर्जात त्याचे नाव, जन्मतारीख, छायाचित्र, स्वाक्षरी, लिंग यामध्ये बदल करू शकतात. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी बीएड (इलेक्ट) पर्याय निवडला नाही त्यांना बीएड (इलेक्ट) चा पर्याय निवडता येणार आहे किंवा उलट पर्याय निवडू शकतात व यामध्ये दुरुस्ती व बदल करण्याची सुविधा त्यांना देण्यात आली आहे.
एमपीएड व एमएड या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सीईटीची प्रवेश नोंदणी ५ ते २० जानेवारी २०२६ पर्यंत होती. यानंतर १० फेब्रुवारीपर्यंत पहिली मुदतवाढ देण्यात आली. यानंतर २४ फेब्रुवारीपर्यंत दुसरी मुदतवाढ देण्यात आली. तिसरी व अंतिम मुदतवाढ २७ फेब्रुवारीपर्यंत देण्यात आली. तर बी. एड. (जनरल व स्पेशल), बी.एड. (इलेक्ट) या अभ्यासक्रमाच्या सीईटीची प्रवेश नोंदणी ८ जानेवारी ते २३ जानेवारी २०२६ पर्यंत होती. १३ फेब्रुवारीपर्यंत पहिली मुदतवाढ देण्यात आली. यानंतर २४ फेब्रुवारीपर्यंत दुसरी मुदतवाढ देण्यात आली. यानंतर तिसरी व अंतिम मुदतवाढ २७ फेब्रुवारीपर्यंत देण्यात आली.
एमपीएड या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा २४ मार्च रोजी होणार आहे. तर त्याची प्रात्यक्षिक परीक्षा २५ मार्च रोजी होणार आहे. तर एमएड या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा २५ मार्च रोजी होणार आहे. बी. एड. (जनरल व स्पेशल ), बी.एड. (इलेक्ट) या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा २७ ते २९ मार्च दरम्यान होणार आहे.
