उच्चस्तरीय चौकशीची गृहमंत्र्यांची घोषणा
मुंबई: बीड जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक आर. राजा यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी विधानसभेत केली. तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असून त्यानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
दिवसेंदिवस बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न गंभीर होत असल्याबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, नमिता मुंदडा, प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर आदींनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेदरम्यान गृहमंत्री बोलत होते. बीड जिल्हयात वाळू माफियांवर निर्बंध आणण्यासाठी कठोर उपाययोजनांची आवश्यकता आहे. आतापर्यंत वाळू माफियांवर वेगवेगळय़ा प्रकरणांत ११९ कारावाया करण्यात आल्या असून १४६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात झालेला गोळीबार हा कौटुंबिक जमिनीच्या वादातून झाला असून जिल्ह्यात गेल्या वर्षभरात १२५६ चोरीचे गुन्हे दाखल झाले त्यापैकी ३५३ गुन्हे उघडकीस आल्याचे वळसे- पाटील यांनी सांगितले.
मात्र या जिल्ह्यात महिलाही सुरक्षित नसून पोलिसांचा धाक राहिलेला नाही त्यामुळे अधीक्षकांना तात्काळ हटवावे अशी मागणी करीत सर्वपक्षीय सदस्यांनी अध्यक्षाच्या आसनासमोरील मोकळय़ा जागेत धाव घेत जोरदार घोषणाबाजी केली. बीडचा बिहार झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके यांनी केली. तर आपल्याला त्रास दिल्याप्रकरणी तक्रार देऊनही पोलिसांनी कारवाई केली नसल्याचे नमिता मुंदडा यांनी निदर्शनास आणले. जिल्ह्यात पोलिसांच्या आशीर्वादाने मटका, जुगार, सट्टेबाजी, अनाधिकृत सावकारी मोठय़ा प्रमाणात सुरू असल्याचा सदस्यांचा भावना लक्षात घेत मुंदडा यांनी केलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यास तात्काळ निलंबित करण्याची तसेच अधीक्षक राजा यांना सक्तीच्या रजेवर पाठिवण्याची घोषणा गृहमंत्र्यांनी केली.