|| नमिता धुरी

प्रशासनाकडून परवानगी नसल्याने अडथळे, प्राथमिक जीवनकौशल्ये, शिक्षण पातळय़ांवर मुलांची पिछाडी

Bhavesh Bhandari and his wife Jinal
Video: रथातून मिरवणूक, मौल्यवान वस्तू फेकल्या; जैन भिक्षूक होण्यासाठी २०० कोटी केले दान
Admission Delayed, 500 Students of college of physican and surgeon, Maharashtra, 500 Students Still Awaiting Admission, physician students, surgeon students, admission awating physican students,
मान्यतेनंतरही सीपीएस अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू करण्यास मुहूर्त सापडेना, ५०० जागांवरील प्रवेशासाठी विद्यार्थी प्रतीक्षेत
english medium schools in pune advertising on social media to attract students
पुणे: इंग्रजी शाळांवर समाजमाध्यमांत जाहिराती करण्याची वेळ… नेमके झाले काय?
Inquiry into deterioration of health of police trainees Neelam Gorhes letter to Home Minister
पोलीस प्रशिक्षणार्थ्यांची प्रकृती बिघडल्याप्रकरणी चौकशी; विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे गृहमंत्र्यांना पत्र

मुंबई : शाळा सुरू होऊन विद्यार्थ्यांचे शिक्षण रुळावर येऊ पाहात असताना विशेष विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू करण्यास अद्याप परवानगी मिळाली नसल्याने परिणामी या विद्यार्थ्यांमध्ये वर्तन समस्या दिसून येत आहेत. विशेष विद्यार्थी मात्र प्राथमिक जीवनकौशल्ये आणि शिक्षण या पातळय़ांवर चाचपडताना दिसत आहेत.

करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात आले व सर्वसाधारण विद्यार्थ्यांच्या राज्यभरातील शाळा सुरू झाल्या. मात्र, स्वमग्न, मतिमंद, कर्णबधिर, अंध अशा विशेष विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली नाही. गेली जवळपास दोन वर्षे घरी अडकलेल्या या विद्यार्थ्यांची दिनचर्या विस्कळीत झाली असून त्यांच्यात वर्तन समस्याही दिसून येत आहेत.

स्वमग्न, मतिमंद अशा विद्यार्थ्यांचे शिक्षण इतर विद्यार्थ्यांसारखे पाठय़पुस्तकावर आधारित नसते. या विद्यार्थ्यांना कपडे घालणे, पाणी पिणे, जेवणे इत्यादी प्राथमिक जीवनकौशल्यांचे प्रशिक्षण द्यावे लागते. त्यानंतर शैक्षणिक अभ्यासक्रम शिकतानाही त्यांच्या आकलनाचा वेग कमी असतो. शाळेत कृतिशिक्षणाद्वारे विविध उपचार या विद्यार्थ्यांवर केले जातात. कर्णबधिर, अंध अशा विद्यार्थ्यांच्या शाळांतील वर्गाची रचनाही वेगळी असते. या सर्व गोष्टींवर ऑनलाइन शिक्षणामुळे मर्यादा आल्या आहेत.

‘शाळा बंद असल्याने विशेष विद्यार्थ्यांचे व्यक्त होणे बंद झाले आहे. अशा स्थितीत ही मुले रागीट किंवा अबोल होतात. ऑनलाइन शिकताना पालकांना त्यांच्यासोबत बसून राहावे लागते. शाळेत या विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवण्याच्या दृष्टीने काही कौशल्ये शिकवली जातात. हे ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून शक्य होत नाही’, असे ‘फोरम फॉर ऑटिझम’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा अय्यर यांनी सांगितले. त्यांनी शाळा सुरू करण्यासंदर्भातील पत्र करोना कृती दलाला दिले आहे.

शाळा बंद असताना इतर विद्यार्थ्यांना स्वमनोरंजन करणे शक्य झाले तसे विशेष विद्यार्थ्यांना करता येत नाही. शिक्षणाची स्वयंप्रेरणा त्यांच्यामध्ये नसते. त्यामुळे त्यांच्या शाळा सुरू करण्याची गरज असल्याचे मत औरंगाबादच्या ‘नवजीवन मतिमंद मुलांच्या शाळे’च्या मुख्याध्यापिका यामिनी काळे यांनी व्यक्त केले. ‘एकाग्रता नसल्याने विशेष विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण अडचणीचे ठरते आहे. यामुळे त्यांची आकलन क्षमता ३० ते ४० टक्क्यांनी कमी झाली आहे’, असे ‘परिवार नॅशनल कॉनफेडरेशन ऑफ पेरेण्ट्स ऑर्गनायझेशन्स’चे कमांडर श्रीरंग बिजूर यांनी सांगितले.

विशेष विद्यार्थ्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असते. त्यांच्यामार्फत त्यांच्या कुटुंबीयांना संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्या शाळा सुरू करण्यात आलेल्या नाहीत. विशेष विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू करण्यासंदर्भातील प्रस्ताव करोना कृती दलाकडे पाठवला होता. त्यांनी शाळा सुरू करू नयेत असे कळवले आहे. सर्व शिक्षकांना लस घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने सर्व तयारी झाली आहे. शासनाच्या आदेशानुसार शाळा सुरू केल्या जातील.  – ओमप्रकाश देशमुख, अपंग कल्याण आयुक्त

स्वाभिमान संस्थेच्या सर्वेक्षणानुसार ऑनलाइन शिक्षणातील अडचणींमुळे ४३ टक्के विशेष विद्यार्थी शाळा सोडण्याचा विचार करत आहेत. केवळ २६ टक्के विशेष विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेऊ शकत आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये अबोलपणा, अस्वस्थता वाढली आहे. आम्ही केलेल्या वैद्यकीय सर्वेक्षणानुसार २९ टक्के विद्यार्थ्यांना प्राथमिक जीवनकौशल्यांचा विसर पडला आहे. ३४.२ टक्के विद्यार्थ्यांच्या वर्तनात गंभीर समस्या दिसून आल्या. जेवढा अधिक काळ हे विद्यार्थी शाळेपासून दूर राहतील तेवढेच त्यांना शिक्षण प्रवाहात परतणे कठीण होत जाईल.

– अर्चना चंद्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जय वकील फाऊंडेशन