मुंबई : ताडदेव – नागपाडा आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या बेलासिस रेल्वे उड्डाणपुलाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी सकाळी लोकार्पण करण्यात आले. या लोकार्पण कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
मुंबई महापालिकेने गती आणि गुणवत्तेसह विहीत मुदतीच्या चार महिने आधीच केवळ पंधरा महिन्यांत मुंबई सेंट्रल रेल्वस्थानकालगतच्या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पालिका प्रशासनाचे कौतुक केले. या पुलाचे नामकरण पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर असे करण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
दक्षिण मुंबईतील जहांगीर बोमन बेहराम मार्गावरील (पूर्वीचे बेलासिस रोड) बेलासिस पूल हा मुंबई सेंट्रल, नागपाडा आणि ताडदेव या भागांना लोहमार्गावरून पूर्व-पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. ब्रिटिशकालीन बेलासिस उड्डाणपूल धोकादायक जाहीर झाल्यानंतर त्याच्या पुनर्बांधणीचे काम मुंबई महानगरपालिकेने हाती घेतले.
ब्रिटिशकालीन १३० वर्षे जुना बेलासिस पूल पाडून त्याची पुनर्बांधणी करण्यात आली. या पुलाचे काम वेळेत पूर्ण व्हावे याकरीता पालिका प्रशासनाने कालमर्यादा निश्चित केली होती. मुंबई महानगरपालिकेने आतापर्यंत हाती घेतलेल्या पुलांची कामे रखडल्यामुळे प्रशासनाला मोठ्या प्रमाणावर टीकेला सामोरे जावे लागले होते.
मात्र बेलासिस पुलाचे काम ठरलेल्या वेळेच्या चार महिने आधीच पूर्ण झाले असून या पुलाचे गुरुवारी लोकार्पण करण्यात आले. यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अमिन पटेल, महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्यासह लोकप्रतिनिधी, महापालिका पदाधिकारी व अन्य संबंधित मान्यवर उपस्थित होते.
मुंबई सेंट्र्ल रेल्वेस्थानकाजवळच्या या १३० वर्ष जुन्या पुलाची कालमर्यादा संपली होती आणि वाहतूकीच्यादृष्टीने अतिशय उपुयक्त असलेल्या या पुलाची पुनर्बांधणी गतीने पूर्ण करणे गरजेचे होते. मुंबई महापालिकेने पुलाचे काम जलद गतीने पूर्ण केले. मुंबईतील अजून जवळपास सहा पूल आता तयार होत असून त्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे येत्या दोन – तीन महिन्यांत इतर सहा पुलांचे लोकार्पणही महानगरपालिकेच्या माध्यमातून होईल, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
पुलाला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव
महानगरपालिकेशी चर्चा करून या पुलाचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असे नामकरण करण्यात येणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यामाता यांनी या देशामध्ये एक उत्कृष्ट प्रशासक कसा असला पाहिजे याचा आदर्श आपल्या कामातून निर्माण केला आहे. त्यांची संवेदनशीलता, धर्मपरायणता, कार्यकुशल प्रजाहितदक्ष राज्यकारभार, कायदा सुव्यवस्थेवर असेलली पकड, त्यांनी तयार केलेली मंदिरे आणि महिलांची पहिली तुकडी, त्यांनी तयार केलेले कारखाने, लघुउद्योग आदी सर्व कामांतून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्यासमोर आदर्श निर्माण केला आहे.
त्यामुळे आजही त्यांचे नाव आपण घेतो कारण त्यांच्यासारख्या उत्कृष्ट प्रशासकांच्या कामातून आपली संस्कृती आणि आपली गुणवत्ता आजही पाहायला मिळते. त्यांच्या कामातून प्रेरणा घेऊन यापुढे राज्य शासन आणि महानगरपालिका कार्य करतच राहतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

