मुंबई : आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीसाठी बंगळुरू हे सर्वात वेगाने वाढणारे मेट्रो विमानतळ ठरले आहे. सहा मेट्रो विमानतळांपैकी, बंगळुरूमध्ये मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत २३.९ टक्के अधिक आंतरराष्ट्रीय प्रवाशांची नोंद झाली. विमानतळावरून आंतरराष्ट्रीय मार्गावर ७२ लाख २७ हजार ३९९ प्रवाशांनी प्रवास केला.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने गेल्या आर्थिक वर्षातील देशामधील सर्व विमानतळांवरील प्रवाशांची संख्या जाहीर केली. विमानतळ आणि शहराच्या कामगिरीची ही आकडेवारी, एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या आर्थिक वर्षात भारतीय विमान वाहतूक क्षेत्रावरील ताण दर्शवते. दिल्ली हे देशातील सर्वात मोठे विमानतळ असून त्याखालोखाल मुंबई आणि तिसऱ्या क्रमांकावर बंगळुरूचा क्रमांक लागतो. गेल्या आर्थिक वर्षात आंतरराष्ट्रीय वाहतुकीत ४.२ टक्यांची माफक, तर देशांतर्गत वाहतूक केवळ १.४ टक्क्यांनी वाढली. एकत्रितपणे, संपूर्ण देशातील प्रवाशांच्या संख्येत १.९ टक्के वाढ झाली. हैदराबादमध्ये ८.२ टक्के,

चेन्नईमध्ये ४.९ टक्के, तर मुंबईमध्ये ४.८ टक्के प्रवासी संख्या वाढली. दिल्लीमध्ये ०.१ टक्के घट होऊन वाढ स्थिर राहिली, तर कोलकातामध्ये २०२५ च्या तुलनेत २०२६ मध्ये ५ टक्के प्रवासी कमी होते.

५३.३ लाख आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या आगमनासह कोचीने क्रमवारीत पाचवे, तर कोलकाता सहाव्या स्थानावर होते. गुवाहाटी, मंगळूर आणि भुवनेश्वर येथे प्रवाशांच्या संख्येत जवळपास एक चतुर्थांश वाढ दिसून आली. अमृतसर, गोवा दाबोलीम, श्रीनगर, पोर्ट ब्लेअर, चंदीगड, इंदूर आणि विझाग येथील विमानतळांवरील प्रवाशांच्या संख्येत घट झाली. यापैकी काही विमानतळांवर नियमित आंतरराष्ट्रीय विमानसेवा उपलब्ध नसल्याने चार्टर सेवा किंवा हज यात्रेसारख्या विशेष विमानसेवा चालविल्या जातात.