मुंबई : आणिक आगारात १२ सीएनजी मिडी बस जळून खाक झाल्याच्या घटनेनंतर बेस्ट उपक्रमाने आगारातील बस किमान दोन फूट अंतरावर उभ्या करण्याचा निर्णय घेतला आहे. कंत्राटदारांना देखील आगारातून बस बाहेर पडण्याच्या मार्गाकडे तोंड करून बस उभ्या करण्याचे निर्देश दिले आहेत. जेणेकरूनआपत्कालीन परिस्थितीत बस त्वरित बाहेर काढता येतील. तसेच आगारांमधील अग्निशमन सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी उपक्रमाने मुंबई महापालिकेकडे मदत मागितली आहे.

रविवार, ४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी लागलेल्या आगीत आणिक आगारातील १२ सीएनजी मिडी बस भस्मसात झाल्या.यातील सात बस नवीन होत्या. आगीत भस्मसात झालेल्या बसपैकी एक बस त्या दिवशी प्रवासी सेवा देऊन आगारात परतली होती. या आगीचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही.

दरम्यान, आगीच्या घटनेनंतर बेस्ट उपक्रमाने आगार आणि बस स्थानकांवरील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. उपक्रमातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागलेल्या बस एकमेकांपासून सुमारे एक ते दीड फूट अंतरावर उभ्या केल्या होत्या. त्यामुळे आगीच्या ज्वाळा वेगाने पसरल्या. संध्याकाळी ५.४५ च्या सुमारास लागलेली आग ७.१५ वाजता नियंत्रणात आली. आग लागली तेव्हा आणिक आगारात ४० हून अधिक बस उभ्या होत्या.

चाव्या शोधण्यात वेळ खर्ची आग नियंत्रणात आणताना आणखी एक चिंतेची बाब होती. ती म्हणजे बसमध्ये पुश-बटन प्रणालीऐवजी पारंपरिक चाव्या वापरल्या जातात. चाव्या शोधण्यात वेळ गेल्यामुळे काही बस बाहेर काढण्यात विलंब झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आगीचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. बेस्टचे अधिकारी बाह्य स्रोताच्या शक्यतेची देखील तपासणी करत आहेत. बसजवळ धूम्रपान करणारी व्यक्ती किंवा परिसरात टाकलेले जळते सिगारेटची थोटके यांचा समावेश आहे. बसजवळ रिकामे पुठ्ठ्याचे खोके, कागदांचे गठ्ठे आणि इतर ज्वलनशील वस्तूही आढळून आल्या.

आगारात सुविधांचा अभाव

या घटनेमुळे अनेक बेस्ट आगारांमध्ये अग्निशमनच्या सुविधांचा अभाव असल्याचेही स्पष्ट झाले. बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी ६ ऑक्टोबर रोजी आगारांमधील अग्निसुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी मदतीची मागणी करणारे पत्र मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पाठविले. आगारात आग विझवण्याची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे सर्व आगारांत अग्निशमन यंत्रणा असलेले वाहन चोवीस तास उपलब्ध करावे, अशी मागणी त्यांनी केली.