scorecardresearch

‘बेस्ट बेकरी’ खटला मुंबईतच चालणार; अन्य न्यायालयात वर्ग करण्याची दोन आरोपींची मागणी न्यायालयाने फेटाळली

सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांच्या चौकशीची मागणीही या आरोपींनी केली होती.

‘बेस्ट बेकरी’ खटला मुंबईतच चालणार; अन्य न्यायालयात वर्ग करण्याची दोन आरोपींची मागणी न्यायालयाने फेटाळली
(संग्रहीत छायाचित्र)

गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या दंगलीत जाळून टाकण्यात आलेल्या बेस्ट बेकरी हत्याकांडाशी संबंधित खटल्यातील दोन आरोपींनी मुंबईतील खटला चालवणाऱ्या न्यायाधीशांवर विश्वास नसल्याचा दावा करून खटला अन्य न्यायालयाकडे वर्ग करण्याची मागणी केली होती. परंतु त्यांच्या मागणीचा अर्ज प्रधान न्यायाधीशांनी फेटाळला. त्यामुळे प्रकरणाच्या दुसऱ्या टप्प्यातील आरोपींवर मुंबईतच खटला चालणार आहे.

या प्रकरणातील साक्षीदारांना पढवून साक्ष देण्यासाठी उभे केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांच्या चौकशीची मागणीही या आरोपींनी केली होती. प्रधान न्यायाधीशांनी ही मागणी फेटाळून खटला अन्य न्यायालयात वर्ग करण्यास नकार दिला.

निष्पापांना अडकवण्यासाठी हा कट रचल्याचा आरोपही अर्जात केला होता –

सेटलवाड यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर हर्षद सोलंकी आणि मफत गोहिल या दोन आरोपींनी सत्र न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीशांकडे अर्ज करून उपरोक्त मागण्या केल्या होत्या. सेटलवाड यांच्या अटकेमुळे आम्हाला दिलासा मिळाला आहे. तसेच आता आम्हाला न्याय मिळेल अशी आशा निर्माण झाल्याचे आरोपींनी अर्जात म्हटले होते. साक्षीदारांना पढवून साक्ष देण्यास उभे केले जात असल्याच्या आमच्या भीतीची खटला चालवणाऱ्या न्यायालयाने कधीच दखल घेतली नाही. तसेच तिस्ता आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निष्पापांना अडकवण्यासाठी हा कट रचल्याचा आरोपही या दोन आरोपींनी अर्जात केला होता.

मुंबई : बेस्ट बेकरी खटला अन्य न्यायालयात वर्ग करा ; खटल्यातील दोन आरोपींची मागणी

तिस्ता यांच्या अटकेनंतर आपण गुजरात पोलिसांशी संपर्क साधला होता. तसेच तिस्ता यांच्या कृत्यांचा तपास झाकिया एहसान जाफरी यांनी संदर्भ दिलेल्या घटनेपुरता मर्यादित ठेवू नये, अशी विनंती केली होती. गुन्हेगारी कृत्यात सहभागी असलेल्या तिस्ता यांच्या सहकाऱ्यांनी कायदेशीर प्रक्रियेत हस्तक्षेप केला असून त्यांनी बनावट पुरावे तयार केलेल्या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करण्याचेही म्हटले होते, असा दावा आरोपींनी अर्जात केला होता.

दोन आरोपींचा तुरुंगात मृत्यू झाला आहे –

आरोपींनी खटल्याला विलंब झाल्याकडेही अर्जात लक्ष वेधले आहे. गेल्या दशकापासून आपण तुरुंगात आहोत. शिवाय दोन आरोपींचा तुरुंगात मृत्यू झाला आहे. आधीच्या आरोपींवर चालवण्यात आलेल्या खटल्यातही साक्षीदारांना पढवून साक्षीसाठी उभे करण्यात आले होते. आमच्यावरील खटल्यातही त्याच्या पुनरावृत्तीची शक्यता आहे. खटला चालवणारे न्यायालय आमची याबाबतची भीती विचारात घेत नाही. त्यामुळेच आमचा या न्यायालयावर विश्वास नसून आमच्यावर चालवण्यात येणारा खटला अन्य न्यायालयाकडे वर्ग करण्याची मागणी आरोपींनी अर्जात केली होती.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या