मुंबई – बेस्ट बसच्या अपघातांत वाढ झाली आहे. चालकांच्या बेदरकारपणामुळे बऱ्याचदा रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांना प्राणही गमवावा लागला आहे. याविरोधात बेस्ट प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. बेस्ट उपक्रम आणि भाडेतत्त्वावरील बस पुरवठा यंत्रणांच्या तब्बल ६०३ जणांचे निलंबन करण्यात आले असून ५८ बसचालकांना बडतर्फ करण्यात आले आहे.
‘बेस्ट’च्या वाढलेल्या अपघातांसंदर्भात शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. याला राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिलेल्या उत्तरात आकडेवारी सादर करण्यात आली. यानुसार अपघाताला कारणीभूत ठरणार्या चालकांसह अन्य कारणांसाठी २०२२ ते २०२५ या कालावधीत बेस्ट उपकमाच्या ६३ बसचालक आणि एकूण ८७६ बसचालकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहितीही सरकारडून देण्यात आली.
दरम्यान, २९ डिसेबरच्या भांडूप अपघातप्रकरणी शासनाकडून पाच लाख तर बेस्टकडून दोन लाखांची आर्थिक मदत करण्यात आलयाचेही यावेळी सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. बेस्ट अपघातांमध्ये भाडेतत्त्त्वावरील बस चालकांकडून होणार्यांची संख्या जास्त असल्याचे मत सुनील शिंदे यांच्यासह प्रवीण दरेकर आणि इतर सदस्यांनी व्यक्त केले. यावर भाडेतत्त्वावरील बसच्या चालकांसाठी विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले.
मालकीच्या केवळ २४९ बस, १० हजार बसची आवश्यकता
पूर्वी बेस्टकडे १,८८२ मालकीच्या बस होत्या, मात्र सध्या ही संख्या २४९ इतकी राहिली आहे, अशी माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधान परिषदेत दिली.
दरम्यान, बेस्टकडे सध्या २,५५८ भाडेतत्त्वावरील बस उपलब्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मुंबईची लोकसंख्या आणि प्रवाशांची गरज लक्षात घेता शहरात किमान १० हजार बसची आवश्यकता आहे. यासाठी बेस्टने विविध कंत्राटदारांना ६,५५५ बस पुरवठ्यासाठी वर्क ऑर्डर दिल्या होत्या. मात्र कंत्राटदारांकडून बस वेळेत उपलब्ध होऊ न शकल्याने अपेक्षित प्रमाणात बससेवा वाढवता आली नाही. मार्च २०२३ पर्यंत १,३०० बस उपलब्ध होणे अपेक्षित होते, मात्र सध्या केवळ ६८५ बस उपलब्ध झाल्या आहेत. बेस्टमध्ये ९०६ मिडी बस कमी रूंदीच्या रस्त्यावर प्रवर्तित करण्यात आलया आहेत. शिवाय पीएमई-ड्राइव्ह योजनेंतर्गत १५०० मध्यम आकाराच्या आणि २०० छोट्या बस अशा एकूण १७०० बस ताफ्यात समाविष्ट करण्यात येणार आहेत.
इलेक्ट्रिक बस चालविण्याचे प्रशिक्षण
भविष्यात होणारे अपघात टाळण्याकरिता उपक्रमाद्वारे बेस्ट बसचालकांना इलेक्ट्रिक बसगाड्यांवरील बसचालकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. यासाठी अद्ययावत प्रणालीद्वारे (सिम्युलेटर) २०० बसचालकांना प्रायोगिक तत्त्वावर प्रशिक्षण दिले जात आहे. स्वामालकीच्या आणि भाडेतत्त्वावरील अशा दोन्ही बसगाड्यांवरील नियुक्त बसचालकांना इलेक्ट्रिक बसगाडी चालविताना घ्यावयाच्या विशेष खबरदारीबाबत सूचना देण्यात येत असल्याचे उत्तरात नमूद करण्यात आले आहे.
