मुंबई : धारावी आगारात बसची भिंतीला धडक, कांदिवली येथे बसगाडीला भीषण आग अशा घटना ताज्या असताना आरे वसाहत येथे गुरुवारी सकाळच्या सुमारास बेस्ट बसने एका चारचाकी वाहनाला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात चारचाकीचा चालक जखमी झाला असून उपचारासाठी जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्राॅमा केअर रुग्णालयात दाखल केले. तसेच दोन्ही वाहनांचे नुकसान झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, मागाठणे बस आगारातील डागा ग्रुपची मिडी सीएनजी बेस्ट बस मार्ग क्रमांक ए ४५१ या मार्गावर गुरुवारी सकाळच्या सुमारास गोरेगाव बस स्थानक (पू) येथून आदर्श नगर येथे जात होती. बेस्टची बस नियमित फेरीवर असताना, आरे वसाहतीतील अंतर्गत रस्त्यावर धावत असताना बसचा ब्रेक निकामी झाला. त्यावेळी बस समोरून येणाऱ्या चारचाकीला धडकली आणि नंतर झाडावर जाऊन आदळली.

धडकेचा आवाज होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बसमधील प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. या घटनेत चारचाकीला चालक जखमी झाला. या प्रकरणी बेस्ट बस चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत बेस्ट उपक्रमाचे अधिकारी व संबंधित पोलीस पुढील तपास करीत आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेचा तपास शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

बेस्ट बसची बेस्टच्या चौकीला धडक; दोन कामगार जखमी

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात भाडेतत्त्वावरील बसचा समावेश केला असून भाडेतत्त्वावरील बसचा अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. बुधवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास धारावी बस आगारात मातेश्वरी कंपनीची बस आगारातील चौकीला धडकली. या घटनेत दोन कामगार जखमी झाले.

धारावी बस आगारात मातेश्वरी कंपनीची बस चालकाने ताब्यात घेतली. बस सुरू करून पुढे नेत असताना बस चौकीला धडकली. बस चालकाने तत्काळ बस मागे घेतली. यावेळी त्या चौकीवरील पत्रा त्या बसमध्ये अडकला व चौकीचा मोठा भाग खाली कोसळला. त्याखाली बसलेले बेस्टचे दोन कर्मचारी जखमी झाले. दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आले.

कांदिवली पूर्वेकडील साई धाम मंदिर जवळ पश्चिम द्रुतगती महामार्गावर बेस्ट बसगाडीला आग लागण्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. बेस्ट बस मार्ग क्रमांक २८९ कांदिवली रेल्वे स्थानक (पू.) ते अनिता नगर, कांदिवली (पू.) असा प्रवास करते. मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास सीएनजी बसगाडीला आग लागली. या घटनेमुळे वाहतूक सेवा संथगतीने धावू लागली होती. घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस, बेस्ट उपक्रमाचे अधिकारी, कर्मचारी पोहचले.