मुंबई : बेस्ट उपक्रमाने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात १३ मोटार अपघात दावे निकालात काढले. बेस्टच्या विरोधातील आठ दावे निकालात काढण्यासाठी बेस्टने तब्बल ९७ लाख रुपये तडजोड शुल्क दावेदारांना अदा केले.तर पाच बाह्य दावेदारांकडून बेस्टने १ लाख ३९ हजार ३५५ रुपयांची नुकसान भरपाई घेतली.

उपक्रमाविरुद्ध मोठ्या संख्येने मोटार अपघात दावे प्रलंबित आहेत. दावे लवकर निकालात काढण्यासाठी लोक अदालत आणि राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तडजोड केली जाते. उपक्रमाकडे मोठ्या संख्येने वाहनांची मालकी असल्याने आणि स्वतःचा त्रयस्थ पक्षकार विमा निधी आहे. यामुळे बेस्टला लोक अदालतमध्ये सहभागी होण्याकरिता, महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरणाकडून आमंत्रित करण्यात येते.

१३ डिसेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय लोक अदालत, मोटार अपघात दावा न्यायाधिकरण, मुंबई आणि मुंबई उच्च न्यायालयात आयोजित केली होती. बाह्य पक्षकारांविरुध्द उपक्रमाकडून मालमत्ता नुकसानीचे दावे दाखल केले होते.

बेस्टने पाच बाह्य पक्षकारांविरुदध दावे दाखल केले होते. बेस्टने १ लाख ९९ हजार रुपयांची मागणी केली होती.दरम्यान, तडजोड शुल्क म्हणून बेस्टला १ लाख ३९ हजार ३५५ रुपये मिळाले. त्यापैकी ७० टक्के रक्कम बेस्टने वसूल केली. सात प्रकरणांमध्ये बेस्ट विरुद्ध ८३ लाख रुपयांचा दावा केला होता. त्यात ४० लाख ५० हजार रुपयांची तडजोड केल्याने बेस्टला ३९लाख ७५ हजार रुपये दावेदारांना द्यावे लागले. या सात दाव्यांमध्ये बेस्टला ४० लाख ५० हजारांची तडजोड मिळाल्याने ५१ टक्के रक्कमेची बचत झाली.

एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने बेस्टला दावेदाराला ६१ लाख ७५ हजार ८४० रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिल होते. मात्र ५७ लाख ४० हजार ९८६ रुपयांवर तडजोड झाल्याने बेस्टची चार लाखांची बचत झाली.