मुंबई : भाडेतत्त्वावरील बसच्या अपघातांच्या पार्श्वभूमी बेस्ट उपक्रमाने कंत्राटी चालकांच्या प्रशिक्षणावर भर दिला आहे. उपक्रमाने ५,२०० कंत्राटी चालकांना सुरक्षा प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विशेष सुरक्षा जनजागृती व प्रशिक्षण मोहीम राबविण्यात येणार आहे. बेस्टच्या ताफ्यात अडीच हजारांपेक्षा जास्त भाडेतत्वावरील बस आहेत. शहरातील सुमारे ८५ टक्के बसमार्गांवर भाडेतत्वावरील बसद्वारे सेवा दिली जाते. मात्र भाडेतत्त्वावरील कंत्राटी चालकांचे गेल्या काही वर्षांत अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. कुर्ला, भांडुप, दादर, अंधेरी व मानखुर्द येथे कंत्राटी बसचे गंभीर अपघात झाले आहेत.
गेल्या सहा महिन्यांत भाडेतत्त्वावरील बसचे २० अपघात झाले असून त्यात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. बसगाड्यांमध्ये कोणतीही तांत्रिक चूक नसून बस चालकांच्या चुकांमुळेच अपघात झाल्याचे उपक्रमाच्या चौकशीत निदर्शनास आले आहे. त्यामुळे उपक्रमाने कंत्राटी चालकांना सुरक्षा प्रशिक्षणावर भर दिला आहे. वाढत्या अपघातांमुळे २४ जुलै रोजी बेस्ट उपक्रम व कंंत्राटी बस कंपन्या यांच्या बैठक झाली. बैठकीत कंत्राटी चालकांना सुरक्षा प्रशिक्षण देण्याचा निर्णय़ बेस्टने घेतला आहे. सुरक्षा मोहिम बेस्टच्या सर्व आगारांत व दिंडोशी प्रशिक्षण केंद्रात कंत्राटी कंपन्यांच्या समन्वयाने राबविण्यात येईल. सुरक्षा प्रशिक्षणात विशेष करून समुपदेशन, सुरक्षितता मार्गदर्शन व प्रात्याक्षिक प्रशिक्षण कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येईल.
‘जीव धोक्यात घालत आहेत’ गेल्या आठवड्यात रात्री साडेनऊच्या सुमारास नेहरू नगर येथे रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होती. मी व माझ्या सोबत असलेल्या एक महिला आम्ही दोघी रस्ता ओलांडताना १२ फुटांवर असलेल्या बसला हात दाखवत मध्यभागी आलो. लाल सिग्नल असतानाही बसच्या चालकाने गाडीचा वेग कमी न करता तशीच बस पुढे दामटवली. तोपर्यंत आम्ही रस्ता ओलांडला होता. पण काही अंतरावरच सिग्नल असल्याने बस पुढे जाऊन थांबली.
बसमध्ये चढून चालकाला हात दाखवून सुद्धा बसचा वेग कमी का केला नाही, अशी विचारणा केली. त्यावर चालकाने फार उद्धटपणे तुम्ही कुठेही हात दाखवणार, मी बस थांबवणार नाही, आता उतरा खाली असे फर्मावले. सिग्नल असतानाही थेट अंगावर बस घालण्याइतकी मजल कंत्राटी चालकांची असेल तर नक्की प्रशासन नागरिकांना सेवा देते की त्यांचा जीव धोक्यात घालण्याचे काम करत आहेत असा प्रश्न पडतो. कंत्राटी चालक बेस्टचे मालक असल्यासारखे वागतात, असे प्रविणा मोरजकर, बेस्ट समिती सदस्य, शिवसेने (ठाकरे) यांनी सांगितले.
कंत्राटी चालकांचा उद्धटपणा प्रचंड वाढलेला आहे. वाढत्या अपघातांमुळे बेस्टची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे बेस्टने स्वमालकीच्या बस घेण्यावर भर दिला आहे. भविष्यात कंत्राटी बस व चालक उपक्रमात नसतील. कंत्राटी चालकांवर आता बेस्टला संस्कार करण्याची वेळ आली आहे. -तृष्णा विश्वासराव, अध्यक्ष, बेस्ट समिती
