मुंबई: बेस्टच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सकस आहार मिळावा यासाठी बेस्ट उपक्रमाने २ मेपासून काही आगारांत ‘अक्षय चैतन्य’ योजना सुरू केली. मात्र अस्वच्छता, दुर्गंधी यामुळे सध्या बेस्टच्या प्रतीक्षा नगर आगारातील कर्मचारी त्रस्त असून साफसफाईकडेही दुर्लक्षच होत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

बेस्टमधील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना पौष्टिक आहार मिळावा, या हेतूने बेस्टने २ मे रोजी माफक दरात सकस आहार योजना सुरू केली. या योजनेनुसार दर दिवशी निरनिराळा आहार उपलब्ध करून देण्यात येतो. बेस्टमध्ये विविध कामांनिमित्त येणाऱ्यांनाही भोजनाचा आस्वाद घेता येतो. सध्या १३ आगारांमध्ये असलेल्या या योजनेची संपूर्ण २७ आगारांमध्येही अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ही योजना लागू करतानाच आगारातील उपाहारगृहात मात्र अस्वच्छता आणि दुर्गंधीचे साम्राज्य असते. अगदी भटारखाना, भोजनगृह येथे इकडेतिकडे पडलेले कागद, खाद्यपदार्थाची वेष्टने असे दृश्य दिसते. त्यातच उपाहारगृहात अधूनमधून वीज जात असल्याने तेथील उकाडय़ात बसणेही शक्य नसते असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.  प्रतीक्षा नगर आगारातील स्वच्छतेकडे उपक्रमाचे दुर्लक्ष होत आहे. अक्षय चैतन्य योजनेच्या नावाखाली मर्जीतील एका खासगी कंत्राटदाराला उपाहारगृह चालवण्यास दिल्याचा आरोप ‘बेस्ट’ समितीचे माजी सदस्य सुनील गणाचार्य यांनी केला. साफसफाईसाठी मनुष्यबळ पुरवण्यात येत नाही. त्यामुळे अस्वच्छता पसरून कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याचेही गणाचार्य म्हणाले.  यासंदर्भात बेस्ट उपक्रमाचे जनसंपर्क अधिकारी मनोज वराडे यांनी उपाहारगृहात दर एक तासाो साफसफाई होत असल्याचे स्पष्ट केले. कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जात नाही. त्यामुळे सर्व आगारातील उपाहारगृहांकडे स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जात असल्याचे वराडे यांनी सांगितले.

ओशिवरा आगारातील उपाहारगृह बंद

बेस्ट उपक्रमाच्या ओशिवरा आगारातील उपाहारगृह गेल्या तीन वर्षांपासून बंदच आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे. हे उपाहारगृहदेखील सुरू करण्याबाबत बेस्ट उपक्रमाकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे गणाचार्य यांनी सांगितले.