मुंबई : गोवंडी शिवाजी नगर आगारातील १० चार्जिंग गन पॉईंट चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारच्या बेस्ट समितीच्या बैठकीत सदस्य रमाकांत गुप्ता यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे उघडकीस आणला. शिवाजी नगर बस डेपोत ४० गन पॉईंट असून एका पॉईंटची किंमत दीड लाख रुपयांपर्यंत आहे. शिवाजी नगर बस आगारात असे चोरीचे प्रकार वारंवार घडत असल्याने बेस्ट उपक्रमाच्या आगारातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, आगाराजवळ उंच सुरक्षा भिंत (कंपाऊंड वॉल) उभारण्यात यावी आणि १५ दिवसांत याप्रकरणी ठोक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी दिली.
बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बसचा समावेश करण्यात येत आहे. इलेक्ट्रिक बस चार्ज करण्यासाठी उपक्रमाच्या आगारात चार्जिंग पॉईंट उभारण्यात आले आहेत. गोवंडी येथील शिवाजी नगर बस आगारात इलेक्ट्रिक बस चार्जिंग करण्यासाठी ४० चार्जिंग गन पॉईंट बसवण्यात आले आहेत. मात्र त्यापैकी १० पॉईंट चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार गुप्ता यांनी बेस्ट समितीच्या बैठकीत निदर्शनास आणून दिली. आगाराजवळ संरक्षक भिंत असून ती ओलांडून काही तरूण गन पॉईंट चोरी करण्यासाठी आगारात येतात. त्या मुलांना गन पॉईंट चोरी करताना रोखले, तर ते सुरक्षा रक्षकावर दगडफेक करतात, असेही ते म्हणाले.
शिवाजी नगर बस आगाराची जागा बेस्ट उपक्रमाची आहे. मात्र या आगारात टाटा मोटर्सच्या बस असल्याने हीच कंपनी देखभालीचे काम करते. या ठिकाणी सुरक्षा रक्षकांच्या संख्येत वाढ करा, अशी सूचना बेस्टच्या दक्षता विभागाने टाटा मोटर्स कंपनीला केली आहे. तसेच संरक्षक भिंतींची उंची वाढवावी, पुढील १५ दिवसांत याप्रकरणी ठोस उपाययोजना करण्यात येईल, असे सोनिया सेठी यांनी यावेळी स्पष्ट केले.
वाहतुकीचे तीनतेरा
शिवाजी नगर आगार हा पूर्व उपनगरातील प्रमुख आणि महत्वाचा आगार आहे. या आगारातून चेंबूर, गोवंडी, मानखुर्द या भागासह नवी मुंबईतही काही बस चालविण्यात येतात. या भागातील बहुतांश परिसर झोपडपट्टी असल्याने येथे बसला नेहमीच गर्दी असते. चार्जिग गन पॉईंट चोरी होत असल्याने बसचे चार्जिग होत नाही, परिणामी बसच्या वाहतुकीवर परिणाम होत असल्याने प्रवाशांची गैरसोय होते.
