मुंबई : बेस्ट जवळपास आठ वर्षांनंतर थेट भरती मोहिमेअंतर्गत ३६४ वाहकांची भरती करणार आहे. वाहक पदासाठी २९ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. या भरतीमुळे उपक्रमाच्या १,०३६ रिक्त वाहक पदांपैकी सुमारे ३५ टक्के पदे भरली जातील. निवड झालेल्या उमेदवारांना २२,५०० रुपये मूळ वेतनासह भत्ते आणि इतर लाभ मिळतील.

बचतीचा मार्ग म्हणून गेल्या अनेक वर्षापासून बेस्टमध्ये नोकरभरती झालेली नाही. त्यातच अनुभवी कर्मचारी-अधिकारी निवृत्त होत असल्याने मनुष्यबळाची कमतरता आहे. मनुष्यबळ वाढविण्यासाठी बेस्टने ३६४ वाहकांची पदे भरण्याचा निर्णय़ घेतला आहे. सुमारे आठ वर्षानंतर उपक्रमात ही पहिलीच थेट भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज १ ऑगस्टपासून सुरू झाले असून २९ ऑगस्टपर्यंत खुले राहणार आहेत. या भरतीमुळे वाहक संवर्गातील सध्याच्या रिक्त जागांपैकी सुमारे ३५ टक्के जागा भरल्या जातील. त्यामुळे सध्याच्या कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होण्याची अपेक्षा आहे.

बेस्टकडे सध्या ७ हजार ४३८ वाहकांची मंजूर पदे आहेत. परंतु ६ हजार ४०२ वाहक सेवेत असल्याने १ हजार ०३६ वाहकांची कमतरता आहे. बेस्टच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, काटकसरीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून उपक्रमाने २०१९ पासून नवीन भरती केली नाही. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मराठी आणि इंग्रजी हे अनिवार्य विषय घेऊन एसएससी (इयत्ता १० वी) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. उमेदवाराकडे आरटीओने दिलेला वैध वाहक परवाना असावा. खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा १८ ते ३८ वर्षे आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी १८ ते ४३ वर्षे आहे. अर्जदारांनी विहित शारीरिक मानकांची पूर्तता करणे देखील आवश्यक आहे. त्यात किमान १६४ सेंमी उंची आणि ४५ किलो वजनाचा समावेश आहे.

वाहकाची निवड ही संगणक-आधारित चाचणीद्वारे केली जाणार आहे. यात अंकगणित, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी, तसेच मराठी आणि इंग्रजी भाषेतील प्राविण्य यांचा समावेश असेल. निवड झालेल्या उमेदवारांना २२ हजार ५०० मूळ मासिक वेतन, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वैद्यकीय आणि गणवेश भत्ता व इतर अनुज्ञेय लाभांसह मिळेल. उमेदवार मोफत बेस्ट बस पाससाठी देखील पात्र असतील. अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी एक हजार आणि राखीव प्रवर्गातील अर्जदारांसाठी ५०० रुपये आहे.

मंजूर वाहक पदे: ७,४३८

कार्यरत वाहक: ६,४०२

रिक्त जागा: १,०३६