मुंबई: आर्थिक संकटात सापडलेल्या बेस्ट उपक्रमाने उत्पन्नवाढीसाठी ”सार्वजनिक – खाजगी भागीदारी” तत्त्वावर आगारांचा व्यावसायिक तत्त्वावर विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. बेस्टच्या २३ बस आगारांच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव आज मुंबई महापालिका सभागृहात मांडला जाणार आहे. या प्रस्तावाला विरोध होईल हे गृहीत धरून सत्ताधारी भाजपा आणि शिवसेना (शिंदे) पक्षाने रणनीती आखली आहे.
शहरात बेस्टची २७ आगारे आहेत. कुलाबा, वांद्रे रेक्लमेशन, धारावी, देवनार, बोरिवलीसह इतर आगारांचे बाजारमूल्य कोट्यवधी रुपयांत आहे. उत्पन्न मिळवण्यासाठी आगारांतील मोकळ्या जागा दिवसा खासगी वाहनांच्या पार्किंगसाठी उपलब्ध आहेत. मात्र त्यातून मिळणारे उत्पन्नही फारसे नाही. त्यामुळे उत्पन्नवाढीसाठी बेस्ट उपक्रमाने आगारांचा व्यावसायिक वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. २७ पैकी २३ आगारे (एकूण १३२ एकर जमीन) खाजगी संस्थांना दीर्घकालीन भाडेपट्ट्यावर देण्याचा प्रस्ताव बेस्टने तयार केला आहे. हा प्रस्ताव बेस्ट समितीमध्ये मंजूर झाल्यानंतर आता हा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गटाच्या नगरसेवकांना सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व्हीप (पक्षादेश) जारी करण्यात आला आहे. यापूर्वी बहुमताअभावी सत्ताधारी पक्षाचे काही प्रस्ताव मंजूर होऊ शकले नव्हते. त्यामुळे यावेळी भाजपा आणि शिवसेना (शिंदे) सत्ताधाऱ्यांनी मंगळवारी विशेष सभा बोलवली आहे.
बेस्टच्या या प्रस्तावानुसार आगारांच्या जागांवर संग्रहालये, निवासी टॉवर्स, क्रीडा सुविधा आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स उभे करण्यात येणार आहेत. आगारांच्या भाडेपट्ट्याचा कालावधी ३० ते ६० वर्षांचा असणार आहे.
दरम्यान, बेस्ट समितीमधील काही सदस्यांनी या प्रस्तावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. बेस्टने यापूर्वी वर्सोवा येथील आगाराची जमीन भाडेपट्ट्यावर दिली आहे. तिथे मॉल बांधला आहे. तसेच कुर्ला आणि माहीम येथील आगाराच्या जागेवर निवासी टॉवर्स उभारले आहेत. दरम्यान, आगारांचा व्यावसायिक वापर आणि आधुनिकीकरण करण्याचे नियोजन यापूर्वीही बेस्टने केले होते. खासगी सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर ही कामे हाती घेताना व्यावसायिकांना आगारांची जागाही उपलब्ध केली. मात्र व्यावसायिकांनी उत्पन्ननिर्मिती केल्यानंतर बेस्टला रक्कम दिलीच नाही.
दरम्यान, आज होणाऱ्या विशेष सभेत सत्ताधाऱ्यांनी अनेक महत्वाचे प्रस्ताव मंजूर करून घेण्याचे ठरवले आहे. त्याकरिता सत्ताधारी पूर्ण तयारीने सभागृहात येतील आणि विरोधकही पूर्ण संख्येने उपस्थित राहतील अशी शक्यता आहे. त्यामुळे आजची बैठक विशेष असेल.
