मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यातील भाडेतत्वावरील चार बसला आग लागण्याच्या घटना घडल्या असून या घटनांमध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नसली तरी चार बसला आग लागल्याने सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. तसेच भाडेतत्वावरील बसच्या देखभाल-दुरुस्तीचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
बेस्ट ही मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जातो. बेस्टच्या ताफ्यात सुमारे २ हजार ७०० बस आहेत. त्यापैकी फक्त २४० बस स्वमालकीच्या आणि उरलेल्या सर्व २ हजार ४५० बस भाडेतत्वावरील आहेत. मे महिन्यात तीन आगारांमध्ये तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये बेस्टच्या भाडेतत्वावरील चार बसगाड्यांना आग लागली. दोन प्रकरणांत बस आधीच नादुरुस्त असल्याने किंवा तांत्रिक बिघाडामुळे सेवेतून काढल्या होत्या, तर इतर दोन घटनांमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे तपासात निदर्शनास आले. या घटनांमुळे कंत्राटदारामार्फत चालवल्या जाणाऱ्या बसच्या देखभालीचे निकष आणि सुरक्षा तपासणीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
भाडेतत्वावरील अनेक बसमध्ये स्टिअरिंग लॉक होणे, ब्रेक निकामी होणे आणि ब्रेक लाइनरच्या समस्यांसारखे गंभीर दोष आढळले आहेत.
कुर्ला बस डेपो-मे ३
इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बसच्या खालच्या बाजूने धूर निघून बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. रात्री ९ पर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते.
तपास अहवाल
डबल-डेकर बस सदोष होती. सदर बस १ मे रोजी पहिल्यांदा चार्ज करण्यात आली, पण सुरू झाली नाही. २ मे रोजी ती पुन्हा चार्ज करण्यात आली, परंतु
समस्या कायम होती. ३ मे रोजी, ‘थर्मल हीटिंग’मुळे बॅटरीमधून धूर आल्याने बसला आग लागल्याचे सांगण्यात आले.
प्रतीक्षा नगर बस डेपो -२५ मे
दिवसभरच्या प्रवासी सेवेतून पार्किंगसाठी बस आगारात परत आली.
परत आल्यानंतर काही वेळातच, बेस्टच्या दोन नॉन-एसी सीएनजीवर चालणाऱ्या बसना आग लागली. दोन्ही बसमध्ये चार वाहनांचे अंतर ठेवून पार्क केल्या होत्या. पहिल्या बसमधील आग नियंत्रणात आणण्यात आली, परंतु त्यानंतर लगेचच, काही अंतरावर उभ्या केलेल्या दुसऱ्या बसनेही पेट घेतला.
तपास अहवाल
वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस स्टेशनच्या प्राथमिक तपासानुसार आगीची ‘ओव्हरहीटिंग’ आणि शॉर्ट सर्किट ही संभाव्य कारणे आहेत. मात्र, बेस्टच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ओव्हरहीटिंगचे कारण नाकारले आहे. बेस्टच्या वरिष्ठ व्यवस्थापनाने सविस्तर समांतर चौकशी सुरू केली आहे.
सांताक्रूझ बस डेपो- २७ मे
पहाटे २:४५ च्या सुमारास सांताक्रूझ आगारामध्ये मातोश्री अर्बन ट्रान्सपोर्टच्या बसला आग लागली. क्लच दुरुस्तीनंतर डिझेल भरण्यासाठी बस नेत असताना शॉर्ट सर्किटमुळे
आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यापूर्वी कर्मचाऱ्यांनी सुमारे २० अग्निशामक यंत्रांचा वापर केला. आग फक्त डॅशबोर्डच्या वायरिंग हार्नेसपुरतीच मर्यादित असल्याचे बेस्टच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
तपास अहवाल
आगीचे ‘शॉर्ट सर्किट’ हे कारण होते, परंतु इतर कारणांची तपासणी करण्यासाठी चौकशी सुरू आहे. डॅशबोर्डवरील फक्त वायरिंग हार्नेस जळाल्याने फारसे नुकसान झाले नसले तरी, बसच्या देखभालीदरम्यान काही त्रुटी होत्या का याची तपासणी सुरू आहे. अंतिम अहवाल एका आठवड्यात येण्याची शक्यता आहे.
आगीच्या घटना बेस्टसाठी एक इशारा आहेत. वाहने पुढे पाठवण्यापूर्वी, बेस्ट अधिकाऱ्यांनी कठोर सुरक्षा तपासणी अनिवार्य करावी, फिटनेस मानकांची अंमलबजावणी करावी आणि देखभालीसाठी पुरेसे मनुष्यबळ सुनिश्चित करावे. – नितीन नांदगावकर,बेस्ट समित सदस्य, शिवसेना (ठाकरे)
