मुंबई : बेस्ट उपक्रमाला खासगीकरणामुळे उतरती कळा लागली आहे. काही वर्षापूर्वी उपक्रमाच्या स्वमालकीच्या ३,९०२ बस होत्या, मात्र आता स्वमालकीच्या २४९ बस शिल्लक असून कंत्राटी बसचा ताफा २,५३२ इतका आहे. त्यातही स्वमालकीच्या २४९ पैकी फक्त २२४ बसगाड्या सुरू आहेत. तर २५ टाटा हायब्रीड बस धारावी आगारात गेल्या २ वर्षांपासून बंद अवस्थेत आहेत. बसची संख्या कमी असल्याने मुंबईकरांचे हाल होत आहेत.
बेस्टच्या ताफ्यातील बसची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून नवीन बस दाखल होण्याचा वेग फारच संथ असल्याने मुंबईकरांची जीवनवाहिनी’ मानल्या जाणाऱ्या बेस्टच्या अस्तित्वाबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. मुंबईकरांकडून ‘बेस्ट’ वाचवण्याची मागणी होत आहे. बेस्टच्या स्वमालकीच्या बसचे आयुर्मान संपल्याने ताफ्यात आता केवळ ९ टक्के म्हणजे २४९ स्वमालकीच्या गाड्या उरल्या आहेत. याउलट खासगी कंपन्यांवरील ‘कृपे’मुळे कंत्राटी बसची संख्या थेट अडीच हजारांवर पोहोचली आहे.
बेस्टने कित्येक वर्षे मुंबईकरांना परवडणाऱ्या तिकीट दरात बससेवा दिली. त्यामुळे बेस्ट आणि मुंबईचे नाते अधिक घट्ट बनले. मात्र मागील काही वर्षांत बेस्टवर कर्जाचा डोंगर वाढत गेला आणि बेस्टची आर्थिक घडी विस्कटली. तोटा कमी करण्यासाठी बेस्टने स्वमालकीच्या बसची खरेदी करण्याऐवजी भाडेतत्वावरील बसवर भर दिला. स्वमालकीचा बसताफा भक्कम करण्याकामी बेस्ट निक्रिय असल्याने मुंबईकरांकडून संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या जात आहेत. विविध संघटनादेखील बेस्ट वाचवण्यासाठी पुढाकार घेऊ लागल्या आहेत.
प्रवासी संख्या घटली बेस्टच्या बसमधून २०१६ मध्ये दररोज सुमारे २७.५३ लाख प्रवासी प्रवास करत होते. त्यातून बेस्टला दररोज सुमारे ३.३७ कोटी रुपये उत्पन्न मिळत होते. मात्र जून २०२६ पर्यंत दैनंदिन प्रवाशांची संख्या १८.३६ लाखांवर आली असून, दैनंदिन उत्पन्नही २.३२ कोटी रुपयांवर घसरले. गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत बेस्टच्या दैनंदिन प्रवासी संख्येत सुमारे ९.१७ लाखांची घट, म्हणजे जवळपास ३३ टक्के घट झाली आहे.
स्वमालकीच्या बसमध्ये ९३.६ टक्क्यांनी घट ! बेस्टकडे २०१६ मध्ये ३,९०२ स्वमालकीच्या बसगाड्या होत्या. तर २०२६ मध्ये बेस्टच्या स्वतःच्या बसची संख्या केवळ २४९ इतकी आहे. म्हणजेच बेस्टच्या मालकीच्या बस ताफ्यात तब्बल ९३.६ टक्क्यांची घट झाली आहे.
