मुंबई : बेस्टने भाडेतत्वावरील दीड हजार मिडी वातानुकूलित बस घेण्याचा निर्णय घेतला आहे. या बस १२ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेण्यात येणार असून त्यासाठी बेस्ट तब्बल ७ हजार २७ कोटी रुपये खर्च करणार आहे. बेस्ट समितीच्या मंगळवारच्या बैठकीत या मिडी बसच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. बेस्टच्या ताफ्यात

२०२७च्या अखेरीस या १५०० मिडी बस दाखल होणार आहेत. बेस्ट उपक्रमाकडे सध्या २ हजार ८०२ बसचा ताफा आहे. वाढती प्रवासी मागणी, मेट्रो मार्गाचे विस्तारीत असलेले जाळे आणि सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्याच्या दृष्टीने बेस्ट बसच्या ताफ्यात वाढ करणे आवश्यक आहे. त्यामुळे बेस्ट बसची संख्या वाढवण्यावर बेस्ट उपक्रम भर देत असून एकूण बसताफा १० हजारपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. केंद्र सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयातर्फे ‘पीएम ई ड्राईव्ह’ योजनेअंतर्गत देशातील विविध मेट्रो शहरांना विद्युत बस पुरविण्यात येत आहेत.

या योजनेअंतर्गंत विद्युत बसकरिता केंद्र सरकारकडून आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे. एका मिडी बससाठी २५ लाख रुपये याप्रमाणे ३७५ कोटी रुपये अनुदान दिले जाणार आहे. उपक्रमाला या योजनेअंतर्गंत नऊ मीटर लांबीच्या १५०० मिडी वातानुकूलित बस मिळणार आहेत. या प्रस्तावाला समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी मंजुरी दिली आहे.

शहरातल्या प्रत्येक नगरसेवकांकडून त्यांच्या परिसरात बस वाढविण्याची मागणी होत आहे. मात्र बसची संख्या कमी आहे. त्यामुळे बस पुरविता येत नाही. केंद्र सरकार १५०० मिडी बस उपलब्ध करून देणार आहे. मुंबईकरांच्या सोयीसाठी या बस घ्यायला हव्या. – तृष्णा विश्वासराव, अध्यक्षा, बेस्ट समिती

बसचा पुरवठा वेळापत्रक

२०२६च्या शेवटच्या तिमाहीत – २२५

२०२७च्या दुसऱ्या तिमाहीत – ३७५ २०२७च्या

तिसऱ्या तिमाहीत – ४५० २०२७च्या

चौथ्या तिमाहीत – ४५०