मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपात मध्यस्थी करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेस्टच्या ताफ्यासाठी येत्या तीन वर्षांत ५ हजार स्वमालकीच्या बस घेण्याची घोषणा केली होती. त्या दिशेने बेस्ट उपक्रमाने नियोजन सुरू केले असून या ५ हजार बससाठी निधी कसा उभा करायचा याची चाचपणी सुरू केली आहे.

उपक्रमाकडे सध्या २ हजार ८०० बस आहेत. त्यात अडीच हजार बस भाडेतत्वावरील आहेत. या बसच्या सहाय्याने शहरातील ४०० बसमार्गावर सुमारे २३ लाख प्रवासी प्रवास करतात. प्रवासी संख्येच्या तुलनेत बसची संख्या खुपच कमी आहे. मुंबईकरांसाठी किमान १० हजार बसची आवश्यकता आहे. बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या महिन्यात विविध मागण्यांसाठी तीन दिवसांचा संप पुकारला होता. कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मध्यस्थी केली होती. परंतु त्या मध्यस्थीला यश आले नव्हते. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचारी संघटनांसोबत बैठक घेतली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांना ३ हजार, तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना २ हजार रुपयांची वाढ देण्याची घोषणा केली. तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी याच आर्थिक वर्षात अदा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.

बेस्टच्या ताफ्यात स्वमालकीच्या बसची संख्या वाढविण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी येत्या ३ वर्षांत ५ हजार नवीन बस खरेदी करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. या ५ हजार बस बेस्ट स्वमालकीच्या घेणार आहे. या स्वमालकीच्या बस खरेदी करण्यासाठी सुमारे पाच हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. हा निधी कशा पद्धतीने उभा करायचा याचे नियोजन बेस्ट उपक्रमाने सुरू केले आहे.

स्वमालकीच्या ५ हजार बसचे नियोजन सुरू – सोनिया सेठी

बेस्टच्या ताफ्यात स्वमालकीच्या ५ हजार बस घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचा इतिवृत्तान्त सोमवारी रात्री उशिरा मंत्रालयातून आला आहे. ५ हजार बससाठी आवश्यक निधीची तरतूद कशी करायची, त्यासाठी नियोजन सुरू आहे. येत्या १५ दिवसांत त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव बेस्ट समितीसमोर सादर करण्यात येणार आहे. या बससाठी आवश्यक मनुष्यबळही भरती करण्यात येणार आहे.