मुंबई : मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत उपनगरीय रेल्वेनंतर दुसऱ्या क्रमाकांवर असलेल्या बेस्ट बसचा ताफा वाढविण्यात येणार आहे. सध्या बेस्टच्या ताफ्यात २,७९३ बस आहेत. केंद्राच्या पीएम ई ड्राईव्ह योजनेंतर्गत बेस्टकडे १,५०० मिडी विद्युत बस येणार आहेत. त्याशिवाय येत्या तीन वर्षांत ताफ्यात ५ हजार नवीन बस दाखल करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. येत्या ३ ते ४ वर्षांत बेस्टच्या ताफ्यातील बसची संख्या १० हजारापर्यंत पोहोचणार आहे. पर्यावरणपूरक, आधुनिक आणि अधिक सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने हा निर्णय स्वागतार्ह असला तरी कामगार भरती बंद असल्याने या बस कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या जीवावर चालवाव्या लागणार आहेत.

भाडेतत्वावरील बसच्या वाढत्या अपघातांमुळे मुंबईकरांचा बेस्टचा प्रवास असुरक्षित बनू लागला आहे. महत्त्वाचे म्हणजे शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्युत बस चालविणारे प्रशिक्षित चालक मिळतील का, अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे. किफायतशीर,वेगवान प्रवासासाठी मुंबईकर बेस्टच्या प्रवासाला प्राधान्य देतात. शहरात ४०० बस मार्गावर दिवसाला सुमारे २३ लाख प्रवासी बेस्टने प्रवास करीत आहेत. मुंबईकरांसाठी ८ ते ९ हजार बसची आवश्यकता आहे. बसची संख्या वाढविण्यासाठी बेस्टचे नियोजन सुरू आहे.

मात्र आर्थिक तोट्यामुळे स्वमालकीऐवजी भाडेतत्वावर बस घेण्यात येणार आहेत. त्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. दरम्यान, बससाठी आवश्यक तज्ज्ञ मनुष्यबळाचा प्रश्न अनुत्तरितच आहे. बेस्ट समितीच्या बैठकीतही या मुद्द्यावर सदस्यांनी चिंता व्यक्त केली. नवीन बससाठी चालक आणि वाहक भरतीचे नियोजन काय, याचे ठोस- समाधानकारक उत्तर अद्याप बेस्ट प्रशासनाकडे नाही. वाहतूक व्यवस्थेत वाहनांपेक्षा मनुष्यबळ अधिक महत्त्वाचे असते.

प्रशिक्षित चालक नसेल प्रवास धोकादायक होतो. विद्युत बस चालविण्यासाठी विशेष प्रशिक्षण, आधुनिक तांत्रिक प्रणाली समजून घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. उपक्रमाला भविष्यात १० हजार बसचे उद्दिष्ट गाठायचे असेल तर किमान ५ ते ६ हजार अतिरिक्त चालकांची आवश्यकता आहे. एका बससाठी किमान १० ते १५ कामगारांची गरज असते. कामाची पाळी पद्धत, साप्ताहिक सुट्ट्या, रजा, आपत्कालीन परिस्थिती आणि देखभाल या सर्व गोष्टी लक्षात घेतल्यास प्रत्येक बसमागे पुरेसे प्रशिक्षित मनुष्यबळ आवश्यक आहे.

कसा मिळतो बस चालविण्याचा परवाना

बस चालविण्याचा परवाना मिळवण्यासाठी चालकाकडे हलक्या वाहनाचा किमान १ वर्षाचा परवाना असणे आवश्यक आहे. आरटीओ कार्यालयात आधी जड वाहनाचा शिकाऊ परवाना काढायचा असतो, त्यानंतर प्रशिक्षण पूर्ण करून अंतिम चाचणी दिल्यावर परवाना मिळतो. शिकाऊ परवाना मिळाल्यानंतर, मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग स्कूलमधून अवजड बस चालवण्याचे प्रशिक्षण पूर्ण करावे लागते. शिकाऊ परवाना मिळाल्यापासून ३० दिवसांनंतर चालक अंतिम लायसन्ससाठी अर्ज करू शकतो. आरटीओ ट्रॅकवर अधिकाऱ्यांसमोर चालकाला बस चालवून दाखवावी लागते.

प्रवासी सुरक्षेचे काय ?

बेस्टचे कंत्राटी कर्मचाऱ्यांवरील अवलंबित्व जास्त आहे. कमी वेतन, मर्यादित सुविधा आणि असुरक्षितता यामुळे अनुभवी चालकांची कमतरता आहे. अवजड वाहने चालविण्याचा कमी अनुभव असणाऱ्या चालकांना प्रशिक्षण द्यावे लागते. बेस्टच्या भाडेतत्वावरील बसचे अपघात सर्वाधिक आहेत. बेस्टमधील अनुभवी चालकांऐवजी कंत्राटदारांकडून कमी वेतनावरील कंत्राटी चालकांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्नही

कुशल चालकांची कमतरता देशात कुशल वाहन चालकांची मोठी टंचाई आहे. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, देशात सध्या तब्बल २२ लाख कुशल चालकांची कमतरता आहे. योग्य प्रशिक्षण केंद्रांचा अभाव आणि अनौपचारिक पद्धतीने ड्रायव्हिंग शिकल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढते. चालकांना कमी वेतन, कामाच्या अनिश्चित वेळा आणि आरोग्याच्या समस्यांचा (उदा. पाठदुखी) सामना करावा लागतो. वाढत्या ई-कॉमर्स आणि लॉजिस्टिक क्षेत्रामुळे कुशल चालकांची मागणी वेगाने वाढत आहे, पण पुरवठा कमी आहे.

चालकांमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा अभाव, डिझेल गाड्यांवरून आता विद्युत बसचे संक्रमण वेगाने होत आहे. आधुनिक बस चालवण्यासाठी वेगळ्या तांत्रिक कौशल्याची व प्रशिक्षणाची गरज, ज्याचा अभाव अनेक जुन्या चालकांमध्ये दिसून येतो. ओला, उबर किंवा खाजगी ट्रॅव्हल्समध्ये चालकांना अधिक उत्पन्न आणि चांगल्या सुविधा मिळत असल्याने तिकडे तरुणांचा ओढा जास्त आहे.

एकूण बस स्वमालकीच्या – २४९

भाडेतत्वावरील – २५४७ एकूण – २७९६

बेस्टमधील चालक-वाहकांचे संख्याबळ

संख्या – चालक – वाहक

बेस्टचे – ६५३४ – ६५७९ कंत्राटी – ६१८० – २०९८

एकूण – १२७१४ – ८६७६

प्रतिक्रिया

”बेस्ट”कडे सुमारे १० हजार बस असतील, ही मुंबई शहरासाठी स्वागतार्ह बाब आहे. उत्तम प्रशिक्षित आणि कुशल चालक मिळवण्यासाठी ”बेस्ट”ला महाराष्ट्र आणि एमएमआर क्षेत्रातील विविध प्रशिक्षण संस्थांशी करार करावे लागतील. तसेच, चालक आणि वाहकांना चांगला मोबदला दिल्यास, खाजगी क्षेत्रातील चालकही ”बेस्ट”मध्ये सामील होण्यास उत्सुक होतील.– विवेक पै, वाहतूक तज्ञ

चालकाकडे परवाना आहे, म्हणजे त्याला वाहन चालविता येते असे समजले जाते.मुंबईकरांसाठी बसची संख्या वाढणार ही चांगली बाब असली तरी बस आणि चालक दोन्ही बेस्टच्या स्वमालकीच्या असाव्यात. मॅन्युअल वाहने चालवणाऱ्यांना ऑटोमॅटिक विद्युत बस चालविण्यासाठी काही आठवडे लागू शकतात. प्रशिक्षणाचा कालावधी जास्त असल्यास तो सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो.– सुधीर बदामी, सिव्हील इंजिनीअर आणि वाहतूक तज्ञ .

बेस्टची संख्या वाढली तर मेट्रोला फिडर सेवा मिळेल, रस्त्यावरील खासगी गाड्यांची संख्या कमी होऊन बसचा वेग वाढेल. आपल्या लोकसंख्येचा विचार केला तर तरुणांची संख्या अधिक आहे. तरुणांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देता येऊ शकते. जर शासन चालकांना प्रशिक्षित करू शकत नसेल तर ते शासन कसले.- महेश झगडे, माजी परिवहन आयुक्त.

भाडेतत्वावरील बस असूच नयेत. प्रशिक्षित चालक असणे अत्यंत गरजेचे आहे. बेस्टने चोख नियोजन आणि नवीन कर्मचारी भरती केल्यास मुंबईकरांना सुरक्षित प्रवासाची हमी मिळू शकते. प्रशिक्षण दिल्यास मराठी तरुणांना नोकरीची संधी मिळू शकते. – नितीन नांदगावकर,(ठाकरे),सदस्य.बेस्ट समिती सभा.