मुंबई : कुर्ला येथील एलबीएस रोडवर बेस्ट शुक्रवारी रात्री बेस्ट बसने एका दुचाकीस्वाराला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार शाहिद शेख (२६) जखमी झाला. त्याला कुर्ला येथील फौजिया रुग्णालयात दाखल करण्यात आले असून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

कुर्ला पश्चिम येथील एलबीएस रोडवरील पेट्रोल पंपासमोरून शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास बेस्ट बस क्रमांक ४११ धावत होती. यावेळी दुचाकीवरून जाणाऱ्या शाहिद शेख याला बसची धडक लागली. यात त्याच्या डोक्याला, हाताला आणि पायाला किरकोळ दुखापत झाली. अपघातानंतर घटनास्थळी गोंधळ उडाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बेस्ट बसचालक पवनकुमार ओझा याला ताब्यात घेतले.

मुंबईकरांची रस्ते मार्गावरील जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी बेस्ट बस अपघातवाहिनी झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून बेस्ट अपघातांचे प्रमाण वाढले आहे. भांडुप येथील बेस्ट बसच्या भीषण अपघात झाला होता. त्यानंतर पवई प्लाझा, आरे कॉलनी येथेही बेस्ट बसचा अपघात झाला. भांडुप येथे २९ डिसेंबर रोजी झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू आणि १० जण जखमी झाले. ३० डिसेंबर रोजी पवई प्लाझा येथे बेस्ट बस आणि दुचाकीस्वाराचा अपघात झाला. यात दुचाकीस्वार जखमी झाला. तर, आरे कॉलनी येथे १ जानेवारी रोजी बेस्ट बसने ट्रकला धडक दिली आणि या अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू झाला होता.

बेस्टच्या अपघाताची मालिका सुरू असून प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे. एकीकडे बेस्ट बसचा ताफा कमी होत असून, प्रवाशांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. बेस्टचा प्रवास असुरक्षित बनल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करीत आहेत.

बेस्ट उपक्रमातर्फे चालकांना प्रशिक्षण

भांडुप येथील बस अपघातानंतर बेस्टच्या कायम सेवेत असलेले आणि भाडेतत्त्वावरील सर्व विदयुत बस चालकांना दिंडोशी वाहतूक प्रशिक्षण केंद्र येथे कौशल्यवृद्धी प्रशिक्षण देण्याचे नियोजन होते. या प्रशिक्षणामध्ये इ-बसची सुरक्षितपणे हाताळणी, वेग नियंत्रण, रस्ते सुरक्षा यावर भर देण्यात येणार आहे. सर्व चालकांनी १०० टक्के प्रशिक्षण पूर्ण करावे याची जबाबदारी संबंधित आगार व्यवस्थापकांची आहे, असे निर्देश बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक डॉ. सोनिया सेठी यांनी सर्व आगारांना दिले.

बेस्टच्या ताफ्यात स्वमालकीच्या फक्त २४९ बस आहेत. बेस्ट उपक्रमाने स्वमालकीच्या बस खरेदी केल्या नाहीत, तर लवकरच ताफ्यात एकही बस शिल्लक राहणार नाही. त्यानंतर बेस्ट उपक्रमाची धूरा ही भाडेतत्त्वावरील बस गाड्यावर असेल. परंतु, भाडेतत्त्वावरील बसगाड्यामुळे प्रवाशांसह कंत्राटी कामगारांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.