लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीचा मुख्य कणा असलेल्या ‘बेस्ट’ उपक्रमाच्या ताफ्यात ऑक्टोबर २०२६ च्या अखेरीस अत्याधुनिक ‘ब्लेड बॅटरी’ तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या २५ नवीन विद्युत बस दाखल होणार आहेत. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीद्वारे या नेक्स्ट-जनरेशन बसचा पुरवठा केला जात आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि कार्यक्षम होणार आहे.

‘ब्लेड बॅटरी’ बसमध्ये वजनाने हलकी असलेली ‘लिथियम आयर्न फॉस्फेट’ बॅटरी थेट बसच्या चेसिसमध्ये बसवण्यात आली आहे. ही बॅटरी सध्याच्या वातानुकूलित ई-बसपेक्षा ३० टक्के जास्त ऊर्जा साठवू शकतात, ज्यामुळे बस एका चार्जवर सलग २ दिवसांपर्यंत धावू शकतात. ब्लेड बॅटरी तंत्रज्ञान हे जगातील सर्वात सुरक्षित मानले जाते. अत्यंत प्रतिकूल हवामानात किंवा अपघातात बॅटरीचे नुकसान झाले तरीही यामध्ये उष्णता अत्यंत संथ गतीने निर्माण होते आणि प्राणवायूची निर्मिती होत नाही, ज्यामुळे आग लागण्याचा धोका फारच कमी असतो.

या बस पूर्ण चार्ज होण्यासाठी अवघे दोन ते अडीच तास लागतात. यामुळे गाड्या चार्जिंग केंद्रांवर जास्त वेळ न थांबता जलद गतीने रस्त्यावर धावण्यासाठी उपलब्ध असतील. या तंत्रज्ञानामुळे बॅटरी पॅकची जागा तब्बल ५० टक्केने वाचते. ज्यामुळे बसचे वजन कमी होऊन अंतर्गत जागा (क्षमता) जास्त मिळते. या नवीन बसच्या समावेशामुळे बेस्टच्या ताफ्यातील वाहनांची उपलब्धता वाढणार आहे. तसेच फेऱ्यांमधील विलंब कमी होईल आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यास मोठी मदत होईल. ‘ब्लेड बॅटरी’ तंत्रज्ञान लंडन आणि सिंगापूरसारख्या शहरांमधील विद्युत बसमध्ये आधीपासूनच वापरले जात आहे.

देखभाल आणि ऑपरेटिंग खर्च कमी

पारंपरिक बॅटरीच्या तुलनेत ब्लेड बॅटरीमध्ये लिथियम आयन सेल्स एका लांब, पातळ पट्टीसारख्या (ब्लेडसारख्या) आकारात डिझाइन केलेले असते. हे सेल्स थेट बसच्या चेसिसमध्ये समाकलित केले जातात. यामुळे बॅटरी पॅकची रचना अतिशय सुटसुटीत होते आणि पारंपरिक बॅटरीच्या तुलनेत ५० टक्क्यांपेक्षा कमी जागा व्यापते. या बॅटऱ्यांचे आयुष्य खूप जास्त असते. त्या ५ हजारपेक्षा जास्त चार्जिंग सायकल्स सहज सहन करू शकतात, ज्यामुळे बसची देखभाल आणि ऑपरेटिंग खर्च कमी होतो.