मुंबई : आर्थिक तोटा कमी करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने काटकसर म्हणून भाडेतत्वावरील बस घेण्यावर भर दिला. मात्र या भाडेतत्वावरील बसच्या सततच्या अपघातांनी उपक्रमाची डोकेदुखी वाढली आहे. गेल्या १७ महिन्यांत ७८९ कंत्राटी चालकांनी बेदरकारपणे वाहन चालवल्याचे उपक्रमाच्या पाहणीत निदर्शनास आले. चालकांच्या बेदरकारपणामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित होत आहे.
जानेवारी २०२५ ते मे २०२६ या कालावधीत बेदरकार आणि भरधाव वाहन चालवल्याने एकूण ८९८ चालकांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये बेस्टच्या
१०९, तर कंत्राटी बसच्या ७८९ चालकांचा समावेश आहे. प्रशासनाने विविध आगारांतील भरधाव वेगात बस चालवणाऱ्या चालकांवर निलंबन, ताकीद, सावधगिरीचा इशारा, चौकशी तसेच संबंधित कंत्राटदारांमार्फत दंडात्मक कारवाई केली आहे. काही प्रकरणांत चालकांना निलंबित केले असून, काहींवर आर्थिक दंडही आकारला आहे. सध्या ‘बेस्ट’ उपक्रमाच्या ताफ्यात भाडेतत्त्वावरील, स्वमालकीच्या अशा २,८०० हून अधिक बस आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत भाडेतत्त्वावरील बसच्या अपघातात वाढ झाली आहे.
समुपदेशन करूनही सुधारणा नाहीच
भांडुप, कुर्ला, दादर येथील अपघातानंतर उपक्रमाने चालकांचे समुपदेशन करण्याचा निर्णय घेतला होता. हॅण्ड ब्रेक, क्लच आणि स्टेअरिंग हाताळताना दक्षता घ्यावी. शहरातील रस्त्यांवर बसचा वेग मर्यादित ठेवावा, बस आगाराच्या बाहेर काढताना योग्य ती तपासणी करून द्यावी, दुचाकी जात असेल तर ओव्हरटेक करू नका, अशा सूचना चालकांना प्रशिक्षण देताना त्यांचे समुपदेशनही केले होते. मात्र, गेल्या काही वर्षांत चालकांचे अशाप्रकारचे समुपदेशन करूनही त्यात सुधारणा झाल्याचे दिसून येत नाही.
सिम्युलेटरची नुसतीच चर्चा
कुर्ला पश्चिम येथील एलबीएस मार्गावर डिसेंबर २०२४ मध्ये झालेल्या बसच्या भीषण अपघातानंतर उपक्रमाने भरती प्रक्रिया, प्रशिक्षण आदींबाबत नियमावली तयार करण्याचा निर्णय घेतला होता. चालकांना सिम्युलेटरमार्फत प्रशिक्षण देण्याचा विचार होता. मात्र, पुढे काहीच झाले नाही. त्यामुळे चालकांचे प्रशिक्षण मानवी पद्धतीनेच सुरू आहे.
सांताक्रूझ आगारात सर्वाधिक प्रकरणे
सांताक्रूझ आगारात सर्वाधिक ३२४ प्रकरणे नोंदली गेली आहेत. त्यापाठोपाठ माहीम आगारात ५०, माजास आगारात ४६, कुलाबा आगारात ४३, गोरेगाव आगारात ३१, तर धारावी आगारात २३ प्रकरणे नोंदविली आहेत. बेदरकार वाहन चालवल्याने सांताक्रूझ आगारातील एका प्रकरणात भाडेतत्त्वावरील कंत्राटदाराला तब्बल ९.७२ लाख रुपये दंड ठोठावला.
