मुंबई : कोरोनाच्या संकटात मुंबईकरांची अहोरात्र सेवा करणाऱ्या बेस्ट उपक्रमातील माजी कर्मचाऱ्यांना प्रशासनाने मोठा दिलासा दिला आहे. निवृत्त आणि सेवामुक्त झालेल्या नऊ हजार ७७ कर्मचाऱ्यांचा प्रलंबित ‘कोविड भत्ता’ अखेर वितरित करण्यात आला असून, प्रशासनाने एकूण २९ कोटी २२ लाख ३८ हजार ७१७ रुपयांचा निधी थेट कर्मचाऱ्यांना अदा केला आहे. यामुळे बेस्टच्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. कोरोना काळात

संपूर्ण मुंबई ठप्प होती, तेव्हा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सेवेकरिता बेस्टचे कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरले होते. या कामाचा मोबदला म्हणून जाहीर झालेला भत्ता मिळवण्यासाठी माजी कर्मचारी दीर्घकाळ प्रतीक्षेत होते. अखेर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, या कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात भत्त्याची रक्कम जमा झाली आहे.

कोविड भत्ता वाटपात सर्वाधिक लाभ वाहतूक आणि अभियांत्रिकी विभागातील माजी कर्मचाऱ्यांना झाला आहे. या विभागातील ६ हजार ८३७ कर्मचाऱ्यांना २२ कोटी १९ लाख ९१ हजार ९८३ रुपयांचे वाटप केले आहे. याशिवाय, विद्युत पुरवठा विभागातील १ हजार ८२० कर्मचाऱ्यांना पाच कोटी ८२ लाख ५३ हजार ४३० रुपये, तर सामान्य विभागातील ४२० कर्मचाऱ्यांना एक कोटी १९ लाख ९३ हजार ३०४ रुपये मिळाले आहेत.

कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

दीर्घकाळापासून रखडलेल्या कोविड भत्त्याची रक्कम मिळाल्याने निवृत्त कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. ‘कोविड योद्धा’ म्हणून केलेल्या कष्टाची दखल प्रशासनाने घेतल्याबद्दल कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, ज्या कर्मचाऱ्यांच्या तांत्रिक अडचणींमुळे रकमा अद्याप जमा झाल्या नाहीत, त्यांचेही प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना उपक्रमाने संबंधित विभागांना दिल्या आहेत.

विभागीय वाटपाचा आढावा

विभाग—-कर्मचारी——–कोविड भत्ता रक्कम (कोटीत) वाहतूक व अभियांत्रिकी विभाग —-६,८३७—२२,१९,९१,९८३ रु

पुरवठा विभाग—–१,८२०—–५,८२,५३,४३० रु

सामान्य विभाग ——४२०——१,१९,९३,३०४ रु

एकूण—-९,०७७—-२९,२२,३८,७१७ रु –